Wed, Sep 26, 2018 14:10



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'एसटीतील कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी आता १ वर्ष'  

'एसटीतील कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी आता १ वर्ष'  

Published On: Jan 10 2018 5:45PM | Last Updated: Jan 10 2018 5:46PM

बुकमार्क करा




मुंबई : प्रतिनिधी 

सध्या एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या १३१ कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी कमी करण्यात आला आहे. हा कालावधी ३ वर्षावरुन १ वर्ष करण्यासंबंधीच्या निर्णयाला नुकतीच दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानुसार लवकरच त्यांना देखील १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने नियमित वेतन देण्यात येणार असल्याचे श्री. रावते यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक एसटी प्रशासनाने आज प्रसारित केले आहे. 

एसटी महामंडळात नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत पहिली ३ वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. परंतु मा. परिवहन व खारभूमी विकास मंत्री, तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सन २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीतील सर्वच कर्मचाऱ्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी ३ वर्षावरुन १ वर्षे करण्यात येणार असून, पहिल्‍या ६ महिन्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला रु. ५००/- वेतनवाढ देण्यात येणार आहे. तसेच वर्षभर समाधानकारक काम केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पुढील वर्षांपासून नियमित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार एसटीत कार्यरत असलेल्या सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांपैकी विविध २५ संवर्गातील मिळून १२ हजार ५१४ कनिष्ठ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला असून, १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्यांचे सुधारित वेतन देण्यात येत आहे.