Tue, Jul 16, 2019 22:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोनोरेलचा पहिला टप्पा 1 सप्टेंबरपासून होणार सुरू 

मोनोरेलचा पहिला टप्पा 1 सप्टेंबरपासून होणार सुरू 

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:53AMमुंबई : प्रतिनिधी 

वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्यादरम्यान नोव्हेंबर महिन्यात आग लागल्याने संपूर्ण मार्गिका बंद करण्यात आली होती. ही मार्गिका अद्याप बंदच आहे. या मार्गावरील मोनोरेल आता एमएमआरडीएमार्फत 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 15 ऑगस्टपासून वडाळा ते चेंबूर या मार्गावर सुरक्षा फेरी सुरू करण्यात आली आहे.

चेंबूर ते वडाळा या मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यादरम्यान नोव्हेंबर 2017 मध्ये आग लागली होती. भक्ती पार्क स्थानकादरम्यान मोनोरेलच्या शेवटच्या डब्याला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण मोनोरेल खाक केली होती. या दुर्घटनेची चौकशी केल्यानंतर मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हापासून हा मार्ग बंदच ठेवण्यात आला आहे. संपूर्ण मार्गिकेला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय ही मार्गिका सुरू करता येणार नाही. अग्निशमन दलानेही या मार्गिकेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने बदल     सुचवले होते. मात्र हे बदल केल्यानंतरही आवश्यक ते सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याबाबत मोनोरेलला अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक सुरक्षेच्या अटी-शर्तींची पूर्तता करीत पहिला टप्पा पुन्हा सेवेत दाखल होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे. तसेच मोनोरेलचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पाही 2019 सालच्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना हे दोन्ही टप्पे सुरू झाल्यावर सलग चेंबूर ते सातरस्ता असा प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांची संख्याही वाढेल, असा विश्‍वासही प्राधिकरणातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.