Wed, May 22, 2019 10:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फेरीवाला राड्यात सरकार मनसेच्या पाठीशी

फेरीवाला राड्यात सरकार मनसेच्या पाठीशी

Published On: Dec 02 2017 1:29AM | Last Updated: Dec 02 2017 1:29AM

बुकमार्क करा

मुंबई : राजेश सावंत

फेरीवाल्यांवरून सुरू झालेला मनसे व काँग्रेसमधील वाद रस्त्यावर आला आहे. पण या वादावर सत्ताधारी म्हणून शिवसेना-भाजपा काहीच बोलण्यास तयार नसल्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. राज्यातील भाजपा-शिवसेना युतीचे सरकार मनसेच्या पाठीशी व उत्तर भारतीयांच्या विरोधात असल्याची त्यांची भावना झाली आहे. येणार्‍या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबईतील उत्तर भारतीय समाज काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत. पण मोदी लाटेमुळे ते भाजपा व काही प्रमाणात शिवसेनेकडे आकर्षित झाले. याचा फटका लोकसभा, विधानसभा निवडणुकीतच नाही तर, फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला बसला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागांवर काँग्रेसचे खासदार निवडून आले होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही मुंबईतील 36पैकी 18 मतदार संघात काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेसचे 60 नगरसेवक निवडून आले. पण 2014 मध्ये मोदी लाटेमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. विधानसभेतही अवघ्या 5 विधानसभेत काँग्रेस विजयी झाली. 2017 च्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस नगरसेवकांचे संख्याबळ 50 टक्क्याने घसरले.  

कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी चोपल्यामुळे राज ठाकरे कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी या मारहाणीला आपल्या पदाधिकार्‍यांना जबाबदार धरले. त्यामुळे मनसे पदाधिकारी पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी शुक्रवारी थेट मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. मनसेने ही जबाबदारी स्वीकारल्यामुळे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटकही केली. पण सत्ताधारी म्हणून भाजपा व शिवसेना काहीच बोलायला तयार नाही. त्यामुळे भाजपा सरकार मनसेच्या पाठीशी असल्याची उत्तर भारतीयांची भावना झाली आहे. तसा प्रचारही काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळे मोदी लाटेमुळे जवळ आलेला उत्तर भारतीय समाज भाजपा व शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता आहे.