होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेच्या दणक्यानंतर मल्टिप्लेक्स व्यवस्थापक नरमले; अन्नपदार्थांचे दर नियंत्रित होणार

मनसेच्या दणक्यानंतर मल्टिप्लेक्स व्यवस्थापक नरमले; अन्नपदार्थांचे दर नियंत्रित होणार

Published On: Jul 07 2018 4:57PM | Last Updated: Jul 07 2018 4:50PMमुंबई : प्रतिनिधी

चहा, कॉफी, पाण्याची बाटली, पॉपकॉर्न, सामोसा आणि बटाटावडा आदी खाद्यपदार्थांचे दर नियंत्रित करून ते पन्नास रुपयाच्या आसपास ठेवले जातील. लहान मुलं, मधुमेही आणि हृदयरोगी यांना आवश्यक अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्यास मज्जाव केला जाणार नाही, असा तोडगा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मल्टिप्लेक्स थिएटर व्यवस्थापनाने काढला आहे.

मल्टिप्लेक्स चित्रपटगृहातील खाद्य पदार्थांचे अवाजवी दर आणि प्रेक्षकांची होणारी फसवणूकीच्या विरोधात मनसेने जोरदार आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मल्टिप्लेक्स चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांची बैठक आज कृष्णकुंज येथे पार पडली.

मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात खाद्य पदार्थांचे दर अवाजवी असतात. तसेच प्रेक्षकांनी विकत न घेतलेल्या पदार्थांचे बिल आकारण्याचे प्रकार सर्रास आढळतात. हे चुकीचे असून प्रेक्षक नाडला जाणार नाही याची दक्षता घ्या. चहा, कॉफी, पाण्याची बाटली, सामोसा आदी पदार्थांचे दर माफक ठेवावेत. तसेच ग्राहकांना तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना राज ठाकरे यांनी बैठकीत केल्या.

मनसेने केलेल्या सर्व सूचना मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाने बैठकीत मान्य केल्या. येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याचं त्यांनी मान्य केल आहे.