Fri, Jul 19, 2019 20:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पॅडमॅन’च्या रियल हीरोला घेतले आयआयटीयन्सनी डोक्यावर

‘पॅडमॅन’च्या रियल हीरोला घेतले आयआयटीयन्सनी डोक्यावर

Published On: Dec 23 2017 2:32AM | Last Updated: Dec 23 2017 1:52AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

पत्नीला मासिक पाळीत होणार्‍या त्रासातून पतीचे हेलावलेले मन व याचा केवळ विचार करत न बसता त्यावर उपाय म्हणून स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन्सच्या सुरू केलेल्या  उत्पादनाची कहाणी असलेला ‘पॅडमॅन’ पडद्यावर येतो आहे. या चित्रपटाचा रिअल लाईफ हीरो अरुणाचलम मुरुगानंदम यांनी सॅनिटरी नॅपकिन्सबाबत जनजागृतीसाठी तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले. ‘पिरियड’चा संकोच बाळगू नका, असा सल्ला अभिनेता अक्षयकुमारने यावेळी तरुणींना दिला. 

 चित्रपटाचा रिअल लाईफ हीरो कोइम्बतूर येथील अरुणाचलम मुरुगानंदम आणि या चित्रपटात त्यांचे काम करणारा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार यांनी शुक्रवार आयआयटी मुंबईच्या ‘मूड इंडिगो’मध्ये थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एरव्ही जाहीरपणे न बोलल्या जाणार्‍या विषयावरच संवाद साधत याबाबत असलेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न करताना उद्याचे आशास्थान असलेल्या तरुणाईलाच त्यांनी साद घातली. चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बल्कीही यावेळी उपस्थित होते.

 सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणार्‍या अरुणाचलम मुरुगानंदम यांच्या जीवनावर आधारित पॅडमॅन हा चित्रपट आहे. आपण केवळ ‘रिल हीरो’ आहे. ‘रिअल लाईफ हीरो’ अरुणाचलम हे समोर असल्याचे अक्षयकुमारने सांगताच आयआयटीयन्सने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत मुरुगानंदन यांच्या कार्याला जणू मानवंदनाचा दिली.

समाजात या विषयावर बोलण्याचे का टाळले जाते? का संकोच केला जातो? असा सवाल करून अक्षयकुमारने मासिक पाळीवर सार्वजनिक चर्चेची कोंडी फोडण्यासाठी थेट विद्यार्थिनींनाच व्यासपीठावर बोलवले. मासिक पाळीच्या काळात कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले याबाबतही विद्यार्थिनींना बोलते केले. विद्यार्थी, विद्यार्थिनींनीही मोकळेपणाने चर्चोत सहभागी होत मनातल्या कोंडलेल्या शंका मोकळ्या केल्या.खरे तर  स्त्रियानां निसर्गाने दिलेली ही देणगी आहे. मात्र यावर मोकळेपणाने बोलले जात नाही. या चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्यासारखी तरुण पिढी तरी या विषयावर मोकळेपणे  बोलेल अशी अपेक्षा अक्षयने बोलून दाखविली.

मुरुगानंदम यांनी आपल्या जीवनातील अनेक अनुभवांचा पट उलगडून दाखविला. या विषयाला सुरुवात केली तेव्हा मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या विषयावर आजही आपल्याकडे गुप्तता पाळली जाते. मासिक पाळीदरम्यान स्त्रियांचे आरोग्य, स्वच्छता यांसारख्या विषयावर बोललेदेखील जात नाही हे आपल्या लक्षात आले. ही गुप्तता दूर करण्यासाठी ग्रामीण महिलांपासून सुरुवात करणे गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, त्यावेळी भारतात तब्बल 88 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापरच करत नसल्याचे अभ्यास करताना लक्षात आले. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांची संख्या मोठी आहे. यामुळे याविषयी महिलांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे होते, असेही अरुणाचलम मुरुगानंदम म्हणाले. आपली पत्नी शांतीला मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणारा त्रास आपल्याला अस्वस्थ करत होता त्यातूनच पॅड कसा बनविता येईल याचा अभ्यास सुरू केला असेही त्यांनी स्पष्ट केले.