Wed, Oct 16, 2019 19:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हुक्‍का पार्लरमुळे भडकली आग

हुक्‍का पार्लरमुळे भडकली आग

Published On: Dec 30 2017 1:46AM | Last Updated: Dec 30 2017 1:26AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

कमला मिल्स कम्पाऊंड मध्ये लागलेल्या आगीत 14 निष्पाप नागरिकांना आपले जीव हकनाक गमवावे लागले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसताना हुक्का पार्लरमुळे ही आग लागल्याची माहिती प्रतीक ठाकूर या प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. हॉटेलमध्ये असलेल्यांपैकी अनेकांनी मद्य रिचवलेले असल्याने व बाहेर पडण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने उपस्थितांचा गोंधळ उडाल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

आपली पत्नी तोरल व त्याच्या भावासोबत प्रतीक हॉटेलमध्ये गेला होता; मात्र आग लागल्यानंतर तो बाहेर पडला.  मात्र बाहेर आल्यावर पत्नी दिसत नसल्याने प्रतीक पुन्हा हॉटेलमध्ये गेला. आतमध्ये तोरलचा भाऊ मयांक भेटल्यावर त्याने तोरल बाहेर गेल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघे हॉटेलबाहेर पडले. तोरलचा भाऊ काही काळ बाथरूममध्ये अडकून पडला होता, त्याला सुरक्षारक्षक बाहेर पडू देत नव्हते; मात्र त्यांनी तेथून बाहेर पडण्यात यश मिळवले व आपला जीव वाचवला. अनेक जणांचा मृत्यू बाथरुममध्ये अडकल्याने गुदमरुन झाला आहे.