होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जीएसटी अधिकारी- कर्मचार्‍यांचे दुसर्‍या दिवशीही ‘काम बंद’

जीएसटी अधिकारी- कर्मचार्‍यांचे दुसर्‍या दिवशीही ‘काम बंद’

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 12:54AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

जीएसटी अधिकारी व कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी सलग दुसर्‍या दिवशीही काम बंद आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्याची आर्थिक स्वायत्तता व विभागाच्या सबलीकरणासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इषाराही देण्यात आला.

केंद्रीय अबकारी कर विभागाने विभागाची पुर्नरचना करून प्रशासकीय यंत्रणा मजबूत केली आहे. याउलट महाराष्ट्रात व्यापर्‍यांची संख्या दुपटीने वाढूनही 2011 नंतर विभागाच्या कामाचा आढावा घेतला गेला नाही. 80 टक्के करप्रशासन राज्याकडे तर 20 टक्के करप्रशासन केंद्राकडे आहे. 20 टक्के करप्रशासनासाठी केंद्र सरकारमध्ये एक प्रधान सचिव, चार मुख्य आयुक्त, अकरा प्रधान आयुक्त, तसेच 34 आयुक्त अशी रचना आहे. मात्र राज्याच्या 80 टक्के कर प्रशासनासाठी एकच आयुक्तांवर सगळा भार सोपविण्यात आला आहे. 

गट ड ते अधिकारी पातळीवरील 35 टक्के पदे रिक्त आहेत. तसेच सोयीसुविधांची वानवा असून खासगीकरण व कंत्राटीकरणाचा घाटही घालण्यात आला आहे. यासंदर्भात गेल्या सहा महिन्यांपासुन याबाबत आवाज उठविला जात आहे. त्याकडे लक्ष न दिल्यामुळे समान काम, समान पद व समान वेतनाच्या मागणीसाठी हे दोन दिवसांचे सामुहिक रजा आंदोलन करण्यात आल्याचे समन्वय समितीच्या पत्रकांत म्हटले आहे.s