Wed, Jul 17, 2019 18:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कारवाईचा बडगा दाखवू नका, प्रश्‍न सोडवा : उद्धव

कारवाईचा बडगा दाखवू नका, प्रश्‍न सोडवा : उद्धव

Published On: Aug 08 2018 5:41PM | Last Updated: Aug 09 2018 1:55AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात शेतकर्‍यांपासून सरकारी कर्मचारी असे सर्वच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. स्वतःच्या न्याय्य हक्‍कांसाठी आंदोलने करणार्‍यावर कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा त्यांचे प्रश्‍न सोडवा, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. मराठा समाजाचे आरक्षणासाठी आणि शेतकर्‍यांचे त्यांच्या न्याय्य हक्‍कांसाठी आंदोलन सुरू आहे. यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ झाले असून, हे सर्वच राज्यकर्त्यांच्या निवडणूक जुमलेबाजीचे परिणाम आहेत. गरिबी हटावपासून अच्छे दिनाच्या घोषणा पूर्ण झाल्या असत्या, तर लोकांचा असंतोषाचा भडका उडाला नसता.

सत्तेवर येण्यासाठी थापा मारल्या, लोकांना फसवले गेले त्याचेच परिणाम सगळे भोगत आहेत. देश अशा जुमलेबाजांमुळे खड्ड्यात गेला आहे. त्यामुळेच शेतकरी, सरकारी कर्मचारी आता रस्त्यावर उतरला असून, त्याला आंदोलन न समजता न्याय्य हक्‍कांचा लढा मानायला हवा. रोजगार, रोजीरोटी यासाठी लोकांना रस्त्यावर यावे लागत असेल, तर हा देश भविष्यात नक्‍की कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी रास्त असून संप चिघळण्याआधी मिटवा. तुमचे कारवाईचे बडगे व दंडुके लांब ठेवा, मंत्रालयातील राज्यकर्ते हे टेम्पररी आहेत. तर सरकारी कर्मचारी कायम आहे, म्हणूनच त्यांच्या मागण्यांचा विचार करून जुमलेबाजीस एकदाचा पूर्णविराम द्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.