Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा : अशोक चव्हाण

सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा : अशोक चव्हाण

Published On: Aug 10 2018 6:19PM | Last Updated: Aug 10 2018 6:42PM मुंबई : प्रतिनिधी

अनेक हिंसक कारवायात गुंतलेल्या सनातन संस्थेच्या एका साधकाच्या घरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने 8 जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. यावरून सनातन संस्था मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट आहे. या अगोदरही बॉम्बस्फोट आणि विचारवंताच्या हत्येप्रकरणात वेळोवेळी सनातनशी संबंधित लोकांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक आहे. तो हिंदू गोवंश रक्षा समितीच्या मार्फत काम करतो. त्याने सनातन संस्थेशी संबधित व्यासपीठावर वेळोवेळी अनेक सभा पत्रकारपरिषदांमध्ये अग्रणी राहून भाग घेतलेला आहे. या अगोदर मालगोंडा पाटील, समीर गायकवाड, विरेंद्र तावडे या सर्वांबरोबरच डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेक-यांचा संबंधही सनातन संस्थेशीच आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच केंद्राकडे या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. परंतु मोदी सरकारने अद्यापही त्यावर कारवाई केली नाही. किंबहुना सनातन संस्थेचे पदाधिकारी मंत्रालय आणि विधीमंडळात मुक्त संचार करित आहेत. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून सनातनसारख्या कट्टरतावादी संघटनांना मोकळे रान मिळालेले आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांनीही हिंदू कट्टरवादी संघटनांचा मालेगाव सारख्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड केले होते. मात्र आज भाजप सरकारच्या कार्यकाळात या प्रकरणातील आरोपींना संरक्षण देऊन निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा संतापजनक प्रकार सुरु आहे. या वेळेसही अशाच त-हेचे बोट चेपे धोरण हे सरकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सनातनच्या साधकांनी बॉम्बस्फोट घडवण्याआधी सनातनवर कारवाई करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.