Fri, May 24, 2019 20:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डी गँगचा शार्पशूटर रामदास रहाणे गजाआड

डी गँगचा शार्पशूटर रामदास रहाणे गजाआड

Published On: Jun 23 2018 5:05PM | Last Updated: Jun 23 2018 5:05PMमुंबई : अवधूत खराडे

कुख्यात मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीम याच्या मुंबईतील कारवाया सुरुच असून दाऊदचा भाऊ अनिस याच्यासाठी काम करणार्‍या शार्पशूटर रामदास रहाणे याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मालाडमधील 59 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देत 50 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे.

हॉटेल व्यावसायिकाने 1999 मध्ये दुबईत एक हॉटेल सुरू केले होते. या व्यवसायामध्ये त्याच्या एका मित्राने 5 लाख दिराम गुंतविले होते. दाऊद टोळीने 2001 मध्ये या मित्राची मुंबईमध्ये हत्या घडवून आणत या हॉटेल व्यावसायिकाकडे त्याच्या मित्राने गुंतविलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. दाऊद टोळीच्या त्रासाला कंटाळून अखेर या हॉटेल व्यावसायिकाने हॉटेल बंद करुन मुंबई गाठली. त्याने मालाडमधील एस. व्ही. रोडवर एक हॉटेल सुरू केले. मात्र दाऊद टोळीने त्याचा पिच्छा काही सोडला नाही. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमने विश्‍वासू साथीदार नासीर खान, समीर जगताप, हेमंत आणि शार्पशूटर रामदास रहाणे याच्या मदतीने या हॉटेल व्यावसायिकाला पुन्हा धमकावण्यास सुरुवात केली. गेल्यावर्षीच्या 31 जुलैपासून या हॉटेल व्यावसायिकाला 50 लाखांच्या खंडणीसाठी थेट अनिसकडून धमक्या येत होत्या. मात्र हा हॉटेल व्यावसायिक आपल्या धमक्यांना भीक घालत नसल्याची खात्री पटल्याने अनिसने त्याला संपविण्याची धमकीसुद्धा दिली. तसेच त्याच्यावर गोळ्या झाडण्याचे काम शूटर रहाणेवर सोपविले होते.

दाऊद टोळीच्या या हालचालींमुळे या हॉटेल व्यावसायिकाला पोलीस संरक्षण देण्यात आले. मात्र मालाडमधील या हॉटेल व्यावसायिकासह आणखी दोन ते तीन जण दाऊद टोळीच्या टार्गेटवर असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अजय सावंत यांच्यासह पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहायक पोलीस निरीक्षक वंजारी आणि अंमलदारांच्या पथकाने टोळीच्या कारवायांवर नजर ठेऊन रहाणेला बेड्या ठोकल्या.

रहाणेच्या अहमदनगर जिह्यातील संगमनेर येथे असलेल्या घरावर छापा टाकून पोलिसांनी एका पिस्तुलासह दोन राऊंड ताब्यात घेतले. रहाणेला न्यायालयाने 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून डी गँगच्या कारवायांची महत्त्वपूर्ण माहिती हाती लागणार असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.