Tue, Nov 13, 2018 06:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोषींवर फौजदारी कारवाई करणार : मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

दोषींवर फौजदारी कारवाई करणार : मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

Published On: Dec 30 2017 1:46AM | Last Updated: Dec 30 2017 1:24AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

कमला मिल आवारातील आगीप्रकरणी निष्काळजीपणा करणार्‍या आणि प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या मुंबई महापालिकेतील पाच अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले असून त्यांनी बेकायदेशीररीत्या परवानग्या दिल्याचे स्पष्ट झाल्यास अधिकारी तसेच संबंधित मालक व चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करून 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्‍तांना दिले. दुपारी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या पाच अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. मात्र, घटनेतील मृत्यूप्रकरणी अधिकारी किंवा संबंधित मालक जबाबदार असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावरही फौजदारी व इतर गुन्हे दाखल करण्यात येतील. दोषींवर निश्‍चित कारवाई केली जाणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कमला मिल कम्पाऊंडमधील अग्‍नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून अशा पद्धतीने परवानग्या देण्यात आलेल्या इमारतींचे तत्काळ सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विनापरवानगी करण्यात आलेली व सुरू असलेली बांधकामे युद्धपातळीवर तोडण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.