होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रिया होणार

जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रिया होणार

Published On: Jun 24 2018 5:08PM | Last Updated: Jun 24 2018 5:07PMमुंबई : प्रतिनिधी

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मात्र, ही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यासंबंधी कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे.

या वर्षीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेत मागासवर्गात आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. परंतु, जात प्रमाणपत्र वैधता तपासणी समितीकडे मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज प्रलंबित आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळणे शक्य होणार नाही. यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2000 (2001 चा महा. 23), यात सुधारणा करण्यासाठी राज्यपालांकडे विनंती केली होती. त्यानुसार राज्यपाल महोदयांनी या सुधारणेसाठी मान्यता दिली आहे.