Mon, Jun 24, 2019 21:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ९९५ झाडांचा जीव टांगणीला!

९९५ झाडांचा जीव टांगणीला!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

विकासाच्या नावाखाली 995 झाडांचा बळी जाणार आहे. पण या वृक्षतोडीला आक्षेप घेत, शिवसेनेने शुक्रवारी झाडांच्या पाहणीची मागणी लावून धरली. याला वृक्षप्राधिकरणात एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या पाहणी दौर्‍यावर झाडांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. 

मुंबईत विकासाच्या नावाखाली दरवर्षी 10 ते 12 हजार झाडांची पालिका वृक्षप्राधिकारणाच्या साक्षीने कत्तल होत आहे. आता पालिकेच्या वृक्षप्राधिकरणात नाले रुंदीकरण, पुलाचे बांधकाम, रस्ता, चारकोप-मालाड येथील नियोजित मेट्रो लाईन 1 ए प्रकल्प, गोरेगाव येथील मेट्रो रेल्वे स्टेशन आदी प्रकल्पांसाठी 646 झाडे कायमस्वरूपी कापणे व 349 झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी वृक्षप्राधिकरणाच्या मंजुरीसाठी आला होता. याला सभागृह नेते यशवंत जाधव यांच्यासह शिवसेना सदस्यांनी आक्षेप घेतला. मुंबईत पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्यात दरवर्षी झाडांची विकासाच्या नावाखाली कत्तल होत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे मत जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. 

शिवसेना विकासाच्या विरोधात नाही. पण विकास करताना, झाडे कशी वाचतील, याचे नियोजन केले पाहिजे. अलीकडे पुनर्रोपणाखाली झाडांचा जीव घेण्यात येत आहे. झाडे कापण्यास मंजुरी देताना, नवीन झाडे लावण्यात येतात का? याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. पुनर्रोपण केलेली 99 टक्के झाडे मरून गेल्याकडेही जाधव यांनी लक्ष वेधले.