Thu, Jan 17, 2019 23:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जगातील सात आश्चर्ये एकाच ठिकाणी

जगातील सात आश्चर्ये एकाच ठिकाणी

Published On: Dec 02 2017 1:29AM | Last Updated: Dec 02 2017 1:29AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

माझगाव डॉकयार्ड रोडजवळ समुद्र चौपाटीपासून 100 फुटापेक्षा जास्त उंच असलेल्या  भंडारवाडा टेकडीवरील जोसेफ बाप्टिस्टा उद्यानाचा कायापालट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. देशी-विदेशी पर्यटकांचे आवडीचे स्थळ असलेल्या या उद्यानात आता येत्या सहा महिन्यांत जगातील सात आश्‍चर्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. यासाठी 2 कोटी 6 लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.

माझगाव डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनजवळील टेकडीच्या माथ्यावर असणारे हे उद्यान सुमारे 5 लाख 44 हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक असणार्‍या या उद्यानामध्ये वेगवेगळ्या प्रजातींची फळझाडे, फुलझाडे, वेली आहेत. उद्यानातून दिसणार्‍या दक्षिण मुंबईच्या विहंगम दृश्यासह येथे असणारा छोटा कृत्रिम धबधबा देखील पर्यटकांना आकर्षित करत असतो. या उद्यानातील आकर्षणांमध्ये आता जगातील 7 आश्‍चर्यांच्या प्रतिकृतींची भर पडणार आहे. यामध्ये ब्राझिल देशातील रिओ शहरातील येशू ख्रिस्तांचा पुतळा, पिसाचा कलता मनोरा, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, कमानकला व स्थापत्य अभियांत्रिकीचे एक श्रेष्ठ उदाहरण मानल्या जाणार्‍या इटलीतील रोम शहरातील कलोसियम या खुल्या सभागृहाचा समावेश आहे. याचबरोबर फ्रान्समधील पॅरीस शहरातील आयफेल टॉवर, पुरातन संस्कृतीशी नाते सांगणारा मेक्सिको देशातल्या टिनम शहरातील चिनचेन इत्झा पिरॅमिड आणि भारतातील आग्रा शहरातील ताजमहालाच्या प्रतिकृतींचाही यात समावेश असणार आहे.