Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलुंडला चेंगराचेंगरीत १२ विद्यार्थी जखमी

मुलुंडला चेंगराचेंगरीत १२ विद्यार्थी जखमी

Published On: Aug 04 2018 1:40AM | Last Updated: Aug 04 2018 1:33AMमुलुंड/मुंबई: प्रतिनिधी

अर्ज करण्याची मुदत फक्त 7 ऑगस्टपर्यंतच आहे... आज फक्त 200 जणांची नोंदणी होणार आहे... जे गेटच्या आत असतील त्यांचीच नोंदणी होणार... अशा अफवा पसरल्याने महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या मुलुंडमधील कार्यालयाबाहेर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी होऊन 12 जण जखमी झाले. यातील गंभीर जखमी आदित्य शिंगाळे (20) याच्यावर मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर या कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून घटनेची नोंद करुन मुलुंड पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मुलुंड पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या रुणवाल स्क्वेअर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे कार्यालय आहे. डी. फार्म आणि बी. फार्मची पदवी किंवा डिप्लोमा केलेेल्या विद्यार्थ्यांची या कार्यालयात ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी केली जाते. या कार्यालयात नोंदणीसाठी प्रथम येणार्‍या 200 जणांची नोंदणी केली जाते. परंतु शुक्रवारी ही संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढली. 

राज्यातील आणि राज्याबाहेरील तरुण-तरुणींनी पहाटे चार वाजल्यापासूनच कार्यालयाबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत पालकही आले होते. साडेसात वाजल्यानंतर ही गर्दी प्रचंड वाढू लागली. सुमारे दीड हजार जण कार्यालयाच्या गेटबाहेर गोळा झाले. त्यावेळी फक्त दोन ते तीन पोलीस अंमलदार आणि इमारतीचे सुरक्षारक्षक या प्रवेशद्वारावर तैनात होते. त्यांनी साडे नऊ वाजता प्रवेशद्वार उघडण्यात येणार असल्याचे सांगून नोंदणीसाठी आलेल्या तरुण-तरुणी आणि पालकांना वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहाण्यास सांगितले. त्यानुसार प्रवेशद्वाराच्या एकाबाजूला तरुणी,दुसर्‍या बाजूला तरुण, तर प्रवेशद्वाराच्या एका कडेला पालक उभे होते.

अफवांमुळेच अपघात

अर्ज करण्याची मुदत फक्त 7 ऑगस्टपर्यंतच आहे, आज फक्त 200 जणांची नोंदणी होणार आहे, जे गेटच्या आत असतील  त्यांचीच नोंदणी होणार, अशा अफवा पसरविणार्‍या चर्चा या गर्दीमध्ये सुरु झाल्या. त्यात साडेआठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. नोंदणीला आणलेली कागदपत्रे भीजू नयेत म्हणून काय करावे हे या तरुण-तरुणींना सुचेना. त्यांनी इमारतीच्या आतल्याबाजूस शेडमध्ये सोडण्याची विनंती सुरक्षारक्षक आणि पोलिसांना केली. यावरुन आरडा-ओरड सुरु असतानाच गेटजवळ असलेल्या मुली आधी आत गेल्यास त्यांचा नंबर लागू शकतो, या शक्यतेतून तरुणांचीही प्रवेशद्वारावर चढाओढ सुरु झाली.

कार्यालयाच्या आत जाऊन रांगेत नंबर लावण्यासाठी प्रवेशद्वारावर उसळलेल्या गर्दीमध्ये तरुणांनी आत घुसण्याचा प्रयत्न सुरु केला. काही जणांनी प्रवेशद्वारांवर चढून आत उड्या घेण्यास सुरुवात केली. यातच प्रवेशद्वार तुटले. त्यात काही जण अडकून पडले, तर काहींचे पाय अडकले. तरीही आत जाऊन रांग लावण्याचा तरुण-तरुणींचा प्रयत्न सुरु होता. तैनात असलेल्या पोलिसांकडून माहिती मिळताच मुलुंड पोलिसांसह राज्य राखीव बलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत, परिस्थीती नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत या चेंगरा-चेंगरीत सुमारे 12 जण जखमी झाले.

राज्याबाहेरून आलेल्या तरुणांना बाहेरचा रस्ता..

राजस्थानच्या उदयपूरमधील रहिवाशी असलेल्या भवर चौधरी यानेही बी फार्मामधून पदवी मिळविली आहे. तो सध्या पुण्यामध्ये नोकरी करत असून नोंदणीसाठी शुक्रवारी सकाळी मुलुंडमधील या कार्यालयात आला होता. चौधरी याच्यासह राज्याबाहेरील सुमारे शंभर तरुणही नोंदणीसाठी आले होते. आधीच महाराष्ट्रातील तरुणांना संधी मिळत नसल्याने राज्याबाहेरुन नोंदणीसाठी आलेल्या तरुणांना येथून हाकलवून देण्यात आल्याची माहिती येथील काही तरुणांनी दिली. 

आम्ही पहाटेच या ठिकाणी आलो होतो. माझी मुलगी प्रवेशद्वाराच्या जवळच उभी होती. इमारतीच्या एकाकडेला उभे राहून मी तीला बघत होतो. चेंगराचेंगरीमध्ये तुटून पडलेल्या प्रवेशद्वारामध्ये तीचा पाय अडकला. हे लक्षात येताच मी धाव घेत, तीला बाहेर काढल्याचे अरुण साबू (65) यांनी सांगितले.

प्रवेशद्वारावर झालेल्या चेंगराचेंगरीत बहीण खाली पडल्याचे दिसले. तीला वाचविण्यासाठी धावलो असता, पुढ्यात एक जण जखमी अवस्थेत दिसला. त्याला पहिल्यांदा उचलून बाजूला नेले आणि नंतर लगेचच बहीणीच्या मदतीसाठी धावल्याचे लातूर येथून बहिणीसोबत नोंदणीसाठी आलेल्या जयवंत वाघमारे याने सांगितले.

म्हणून ओढवला प्रसंग...

मुलुंड पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गाला लागून असलेल्या खाजगी इमारतीमध्ये महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे कार्यालय आहे. ही इमारत खाजगी असल्याने याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात असतात. त्यांनी नेहमीप्रमाणे इमारतीचे प्रवेशद्वार बंद ठेवले होते. गेल्या काही दिवसांपासून येथे राज्यभरातून उमेदवार येत असल्याने दोन ते तीन पोलीस अंमलदार तैनात होते. 
शुक्रवारी सकाळी गर्दी वाढत असल्याचे लक्षात घेऊन त्यांना प्रवेशद्वारावर एकत्रित उभे राहू न देता, एका रांगेत उभे राहाण्यासाठी सुचना देणे, तसेच अतिरीक्त पोलीस मदत बोलवणे आवश्यक होते. याबाबींकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.