Wed, Mar 20, 2019 12:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंब्रा पुलाची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

मुंब्रा पुलाची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Published On: Aug 06 2018 8:06PM | Last Updated: Aug 06 2018 8:06PMठाणे : प्रतिनिधी 

मुंब्रा पुलाची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाने आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिली. कोणत्याही परिस्थितीत ही वेळ पाळली जावी असे सांगून पालकमंत्र्यांनी सर्व पालिका हद्दीतील व ग्रामीण भागातील रस्त्यांचे खड्डे पॉलिमरसारखे तंत्रज्ञान, रेडी मिक्स वगैरे सारख्या पद्धतीने तातडीने बुजवावेत, पोलिसांना मदत करण्यासाठी १०० वाहतूक वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण सुचना केल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात मुंब्रा बायपास दुरुस्ती तसेच एकूणच ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, भिवंडी परिसरात होणारी वाहतूक कोंडी यावर विस्तृत चर्चा झाली.

१० सप्टेंबर डेडलाईन

सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेलचे अभियंता आर एस पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, १० सप्टेंबरपर्यंत पूल व बायपासची दुरुस्ती पूर्ण होईल. मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंब्रा रस्त्यावरील काही भाग खचला त्यामुळे नवी समस्या निर्माण झाली. या रस्त्यालगत राहणाऱ्या काही कुटुंबाना ठाणे पालिकेने पर्यायी तात्पुरती निवास व्यवस्था करूनही ती कुटुंबे तिथून न गेल्याने दुरुस्तीला उशीर होतो आहे असे पाटील यांनी सांगितले. पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबे हलविण्याची व्यवस्था करूत असे सांगितले. गेमन चौक येथील दुरुस्ती देखील तितकीच महत्वाची असून पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकीतूनच बोलून २५ ऑगस्टपर्यंत ही दुरुस्ती पूर्ण झाली पाहिजे असे निर्देशही दिले.

गोदामांच्या वाहतुकीला नियंत्रण

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी भिवंडी येथील गोदामांच्या वाहतुकीस नियंत्रणात आणले व त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली तर बराच प्रश्न सुटेल असे सांगितले. तेथील प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी भिवंडीतील वाहतूक ट्रक्स संघटनांशी बोलून त्या भागातील वाहतूक नियंत्रित करावी तसेच अवजड व जड वाहनांचे वेळापत्रक निश्चित करावे असे सांगितले.

उरण –जेएनपीटी तसेच पालघरकडून येणारी वाहने देखील नियंत्रित करण्याच्या सुचना होत्या मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी तसेच संबंधितांशी बोलण्यात येऊन तत्काळ सुचना देण्यात येतील असेही ते म्हणाले. टोल नाक्यावरील गर्दीच्या वेळी पिवळ्या रंगाच्या पट्टीचा नियम  पाळण्यात येऊन रांगा सोडाव्यात व गर्दी कमी होईल असे पाहावे असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

जड अवजड वाहनांसाठी अतिरिक्त वाहनतळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने पोलीस कार्यवाही करतील असेही ठरले.

तलासरी- दापचेरी कडून येणारी वाहने मनोरमार्गे सोडता येतील का ते पहावे, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वाहने क्षमतेपेक्षा जादा भरलेली नाहीत ना याची काटेकोर तपासणी करावी असेही पालकमंत्री म्हणाले.

पत्री पुलाच्या उंचीचे अडथळे थोडे अधिक उंच करण्यात यावेत जेणे करून हलक्या वाहनातील टेम्पो वगैरे सारखी मध्यम आकाराची वाहने जाऊ शकतील असेही अमित काळे यांनी सुचना केली.

नोडल अधिकारी नियुक्ती

एकूणच जिल्ह्यातील वाहतूक कोंडीबाबत सर्व संबंधित यंत्रणासमवेत समन्वय साधण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे आणि निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील हे समन्वय अधिकारी असतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वाहतुक कोंडीचे प्रश्न सोडवितांना अडचणी आल्यास या दोघांशी यंत्रणांनी संपर्क साधावा असे ते म्हणाले. प्रवासी संघटना, टेक्सी संघटना, ओला, उबेर यांचा सहभाग असलेली वाहतूक सल्लागार समिती नेमण्याचे ठरविण्यात येईल असेही ते म्हणाले.  

एफएम वाहिनीची मदत घेणार

प्रवासी महासंघाचे मिलिंद बल्लाळ यांनी वाहतूक कोंडीबाबत तक्रारींवर त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच वाहनधारक आणि एकूणच नागरिकांना वाहतूक कोंडी किंवा रस्ते दुरुस्तीची अद्ययावत माहिती मिळाली पाहिजे अशी सुचना केली. यावर पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी एफएम रेडीओ वाहिनीच्या माध्यमातून ठाणे आयुक्तालयातील वाहतूक नियंत्रण कक्ष हा सातत्याने अशी माहिती पुरवित राहील अशी व्यवस्था करण्याचे मान्य केले.

१०० वाहतूक वॉर्डन

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खड्डे बुजवणे महत्वाचे आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी किमान मध्यरात्रीच्या वेळी पालिकांनी खड्डे बुजविण्याची प्रक्रिया प्राधान्याने करावी असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या पोलिसाना मदतीसाठी दिलेले वाहतूक वॉर्डन्स अपुरे असून १०० वॉर्डन्स एमएसआरडीसीने द्यावेत असेही ते म्हणाले. वाहतूक कोंडीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना ,वाहनधारकांना मोठा फटका बसत असून सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून या प्रश्नाकडे पाहावे व लोकांची गैरसोय होणार नाही असे पाहण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.

प्रारंभी निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी प्रस्तावना करून या प्रश्नाविषयी माहिती दिली.