Sat, Nov 17, 2018 04:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजापूर रिफायनरीवरुन शिवसेना - भाजपमध्ये जुंपणार

राजापूर रिफायनरीवरुन शिवसेना - भाजपमध्ये जुंपणार

Published On: Dec 20 2017 1:17PM | Last Updated: Dec 20 2017 1:23PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

राजापूरमधील रिफायनरी ही शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या आग्रहामुळेच आल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.  या विधानावर  शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर देत राजापूरची रिफायनरी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आग्रहामुळेच आल्याचे आता सिध्द झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प कोकणात आणण्यासाठी मी कोठे मागणी केली होती त्याची लेखी माहिती तात्काळ द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपात जुंपण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कोकणातील रिफायनरीसाठी केंद्रियमंत्री अनंत गीते आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आग्रह धरला होता असे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले असून, राजापूर येथील रिफायनरी हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळेच होत असल्याचे या पत्रात नमुद केले आहे. मुख्यमंत्र्यांनी काल केलेले विधान हे असत्य आहे असेही राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.

‘मुख्यमंत्री फडणवीस, माझी सदसदविवेकबुध्दी आजही शाबुत आहे. त्यानुसार हा प्रकल्प राजापूर अथवा कोकणात कोठेही यावा यासाठी कोणालाही भेटलो नाही अथवा विनंती केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय पेट्रोलियममंत्री यांना कधी भेटलो नाही अथवा अप्रत्यक्ष निवेदनाद्वारे मागणी केली किंवा संसदेत यासंदर्भात मागणी केल्यासंदर्भात आपण तात्काळ लेखी माहिती द्यावी.’ अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली असल्याने राजापूर येथील रिफायनरीवरून शिवसेना आणि भाजपातील सामना रंगण्याची शक्यता आहे.