Wed, Jul 17, 2019 00:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन

अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:43AMमुंबई :  प्रतिनिधी

मराठा समाजातील तरुणांना देण्यात येणार्‍या कर्जापैकी 85 टक्के कर्जाची हमी राज्य सरकार घेणार होते. मात्र,या  आश्वासनाची पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या लेखी मान्य केल्या होत्या. त्याचा पाठपुरावा म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निवेदनही देण्यात आले होते. या महामंडळामार्फत मराठा समाजातील तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज मिळणार असून 85 टक्के कर्जाची हमी घेण्यात येणार होती.

त्यासबंधीचा शासन निर्णय जोपर्यंत लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत महामंडळाच्या कार्यालयातून उठणार नाही, असा पवित्रा आबासाहेब पाटील व रमेश केरे पाटील यांनी घेतला. मात्र, या मागणीची पूर्तता पुढच्या महिन्यात करण्याबाबत लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हा ठिय्या मागे घेण्यात आला. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ होणार असेल तर मराठा क्रांती ठोक मोर्चा आता सरकारी कार्यालयातच आंदोलने सुरू करेल, असा इशाराही आबासाहेब पाटील आणि रमेश केरे पाटील यांनी यावेळी दिला.