Mon, Apr 22, 2019 23:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रियकराच्या मदतीने आईनेच घेतला चिमुकल्याचा जीव

प्रियकराच्या मदतीने आईनेच घेतला चिमुकल्याचा जीव

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 11:17PMनाशिक : प्रतिनिधी

पँटीत शी का केली या शुल्लक कारणावरून निर्दयी मातेने प्रियकराच्या मदतीने सहा वर्षीय चिमुरड्यास धोपटण्याने बेदम मारहाण करून जमीनीवर आपटून खुन केला. नकुल सुधाकर थोरात असे या चिमुरड्याचे नाव आहे. शरणपूर रोडवरील मिशन मळा येथे रविवारी (दि.25) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 

सोनुबाई उर्फ सोनाली सुधाकर थोरात (29) आणि साहिल उर्फ निरंजन जगप्रसाद चतुर्वेदी (31, रा. पंचवटी) असे या संशयित आरोपींचे नावे आहेत. सोनाली हिचा सुरुवातीस संतोष रमेश जाधव (रा. पांजरपोळ) याच्यासह विवाह झाला. त्यांना नंदीनी (10), विघ्नेश (7) आणि नकुल (6) अशी अपत्ये झाली. मात्र पती दारु पिऊन बेदम मारहाण करतो या कारणावरून संतोष सोबत न राहता 2015 मध्ये सुधाकर थोरात याच्यासह दुसरा विवाह केला.

काही महिने सोबत संसार केल्यानंतर सोनालीने दुसरा पती सुधाकर यांच्यासोबतही न राहता स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर वर्षभरापासून सोनाली आणि साहिल यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान त्यांनी नंदीनी, विघ्नेश आणि नकुल या तिघांनाही शिक्षणासाठी महिरवणी येथील आश्रम शाळेत टाकले. सुट्टी असल्यावर तीनही मुलांना ते घरी आणत. सोनाली मिशन मळा परिसरात भाडेतत्वाने घर घेऊन राहत होती. सुट्टी असल्याने सोनालीने शनिवारी तीनही मुलांना शाळेतून घरी आणले होते. रविवारी रात्रीच्या सुमारास नकुलने पँटमध्ये शी केली. ही बाब सोनालीला समजताच तिने नकुलला मारहाण केली.

शाळेत जात नाही, वर्गात न बसता जंगलात का जातो असे बोलून साहिलने देखील धोपटन्याने नकुलला बेदम मारहाण केली. यावेळी नकुलची बहिण नंदीनी हिने नकुलला वाचवण्याचा प्रयत्न केला तिला देखील बेदम मारहाण करण्यात आली. रात्रभर वेदनेने विव्हळत नकुलने शेवटचा श्‍वास घेतला. सोमवारी (दि.26) सकाळी सोनाली आणि साहिलने जिल्हा रुग्णालयात नकुलला उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने त्यांनी पुन्हा नकुलला घरी आणले. ही बाब परिसरातील महिलांना समजताच त्यांनी सोनालीकडे याची विचारणा केली. त्यावेळी तो आजारपणात गेल्याचे तिने सांगितले. मात्र नकुलच्या अंगावरील जखमा पाहून महिलांनी सरकारवाडा पोलिसांना याची माहिती दिली.

त्यानंतर एस्तेर सतीश दलाल (रा. मिशनमळा) हिच्या फिर्यादीवरून सोनाली आणि साहिल विरोधात नकुलचा खुन केल्याप्रकरणी आणि नंदिनीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. 

धोपटण्याचे तुकडे

निर्दयी सोनाली आणि साहिल यांनी चिमुकल्या नकुलच्या पायावर उभे राहून बेदम मारहाण केली. नकुल वेदनेने विव्हळत असतानाही दोघांना दया आली नाही. नाजुक नकुलच्या अंगावर मारहाण होत असताना धोपटण्याचेही तुकडे झाले. तरीदेखील दोघांनी त्यास मारहाण सुरुच ठेवली. त्यानंतरही त्यांच्यातील क्रुरता संपली नाही. त्यांनी जखमी नकुलला उचलून जमीनीवर जोरात आपटले. त्यानंतर त्याला बळजबरीने झोपण्यास सांगितले. 

नंदिनीवरही प्राणघातक हल्ला

या मारहाणीत नकुल वेदनांनी विव्हळत होता. रात्रभर अर्धझोपेत तो बरळत असल्याने नंदीनीने आईला नकुलला दवाखान्यात घेऊन जा अशी विनवणी केली. यामुळे संतप्‍त होत साहिल आणि सोनालीने नंदीनीलाही धोपटण्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर तिलादेखील जमीनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी पोलीस आणि परिसरातील महिला घरात शिरल्या त्यावेळी नंदीनी घरातील पलंगाखाली भितीपोटी लपून बसलेली होती. पोलिसांनी तिला धीर देऊन बाहेर काढले. मात्र तिला ताप आल्याने आणि दुखापती असल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु आहेत.