होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशातील सर्वांत महाग पेट्रोल परभणीत

देशातील सर्वांत महाग पेट्रोल परभणीत

Published On: Sep 12 2018 2:07AM | Last Updated: Sep 12 2018 2:07AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली असताना मंगळवारी राज्यात पेट्रोलच्या दराने 88 रुपयांचा आकडा पार केला. विशेष म्हणजे राज्यातील परभणीमध्ये 90.11 रुपये प्रतिलिटर अशा भावाने पेट्रोल विकले जात असून हा देशातील सर्वाधिक दर आहे. मंगळवारी पेट्रोल दराने नव्वदी पार केली असताना डिझेल दराने 77.92 रुपयांवरुन 78.06 रुपयांवर उडी घेतल्याचे परभणी जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी सांगितले. 

सर्वाधिक दराने विकल्या जाणार्‍या शहरांमध्ये परभणीनंतर नांदेडचा क्रमांक लागतो. याठिकाणी पेट्रोल 89.93 रुपये तर डिझेल 77.90 रुपये प्रतिलिटर अशा भावाने विकले जात आहे. यानंतर अमरावतीमध्ये 89.93 रुपये व 78.84 रुपये अशा भावाने पेट्रोल व डिझेल विकले जात आहे. याशिवाय ठाण्यात पेट्रोल 88.43 रुपये व डिझेल 77.64 रुपये तर मुंबईत पेट्रोल 88.35 रुपये व डिझेल 77.56 रुपये अशा दराने विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय संकटामुळे पेट्रोलियम पदार्थांमध्ये दरवाढ झाली असून हा तात्पुरत्या स्वरुपाचा त्रास असल्याचा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

मराठवाड्यात सोमवारी पेट्रोल 89.97 रुपये तर डिझेल 77.92 रुपये प्रतिलिटर अशा दराने विकले जात होते. गेल्या सलग 15 दिवसांपासून इंधनांच्या किमतीत वाढ होत आहे. मंगळवारीही पेट्रोल दरात 14 पैसे तर डिझेल दरात 15 पैसेे इतकी वाढ झाली.