होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत मान्सूनचे जोरदार पुनरागमन!

मुंबईत मान्सूनचे जोरदार पुनरागमन!

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात वीकेंड साजरा करून गायब झालेल्या मान्सूनने मुंबईत रविवारी जोरदार पुनरागमन केले. रविवारी पहाटेपासूनच पाऊस संततधार कोसळू लागल्याने मुंबईच्या अनेक भागांत पाणी साचले व मुंबईची दाणादाण उडाली. रेल्वेच्या तीनही मार्गांवर आधीच मेगाब्लॉक आणि त्यात संततधार पाऊस, यामुळे मुंबई दर्शनसाठी बाहेर पडलेल्यांचे अतोनात हाल झाले. येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. 

मरिन ड्राईव्हला सेल्फी काढण्याच्या नादात तरुण बुडाला

पुन्हा एकदा सेल्फी काढण्याच्या जीव गमविण्याची वेळ तरुणावर आली. सेल्फी घेण्याच्या नादात 20 वर्षीय तरुणाने शनिवारी दुपारी मरिन ड्राईव्ह किनार्‍यावर जीव गमावला. किनार्‍याच्या कठड्याखालील दगडांमध्ये उतरून मित्रासोबत सेल्फी घेताना हा तरुण घसरला आणि ओहोटीच्या लाटांत सापडून समुद्रात बुडाला. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी समुद्रात उडी मारणारा तरुण जखमी झाला. तर दुसरीकडे मित्र बुडत असताना त्याच्यासोबतचा मित्र तेथून पळून गेला. दरम्यान, बुडालेल्या तरुणाला 20 मिनिटांनंतर बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रेल्वेसेवा व रस्ते वाहतुकीवर परिणाम 

जोरदार पावसाचा रेल्वे वाहतुकीसोबतच रस्ते वाहतूक सेवेवरही प्रचंड परिणाम झाला आहे. जागोजागी मेट्रोची सुरू असलेली कामे, शिवाय अजूनही रस्तेदुरुस्तीची कामे सुरू असल्याने रस्ते वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली. त्यातच रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने मुंबई दर्शन करण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला.

जोगेश्‍वरी येथे भिंत कोसळली 

मुंबईतील जोगेश्‍वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाहीत. शनिवार सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दोन इमारतींमध्ये असलेली ही संरक्षण भिंत कमकुवत झाली होती.त्यामुळे रहिवाशांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भिंतीजवळील भाग रिकामा केला होता. अखेर रात्री ही भिंत कोसळली. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले.