Mon, Jun 17, 2019 15:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घाटकोपरमध्ये तरुणीचा विनयभंग !

घाटकोपरमध्ये तरुणीचा विनयभंग !

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 1:00AMघाटकोपर : वार्ताहर

22 वर्षीय प्रवासी तरुणीला फरफटत नेत रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केल्याची धक्‍कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घाटकोपरला जागृती नगर मेट्रो स्थानकालगत घडली. यात तिचा एक दातही तुटला आहे. घाटकोपर पोलिसांनी आरोपी मेरू युनूस खान (19) याला बेड्या ठोकल्या आहेत.

रिक्षाचालकाने तरुणीच्या हातातील पैशाची पर्स, मोबाईलवर देखील डल्‍ला मारला. घाटकोपर पोलिसांनी दहा तासांच्या आतच आरोपी रिक्षाचालकाला अटक केली. तो  आझाद नगर, घाटकोपर येथील असून तो एमएच 03 बी.व्हाय  5476  क्रमांकाची रिक्षा भाड्याने चालवतो. 

जखमी अवस्थेत तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला. घाटकोपर पोलिसांनी तिला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शुक्रवारी तिच्या तक्रारीवरून कलम 397, 534, 367 अंतर्गत गुन्हा नोंदवला.  सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घाटकोपर आझाद नगर विभागातून आरोपीला अटक केली. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा देखील ताब्यात घेतली. 

घाटकोपर वर्सोवा लिंक रोडवर अनधिकृतपणे उभ्या असणार्‍या बस, ट्रकमुळे अशा प्रकारांत वाढ झाली आहे. येथील वाहनांवर कडक कारवाईची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. या घटनेमुळे सायंकाळी देखील रिक्षातून प्रवास करणे मुंबईत महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.  

गुरुवारी सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान हिरानंदानी येथे पीडित तरुणी कलिनाला तिच्या घरी जाण्यासाठी रिक्षात बसली. घाटकोपरला एका मित्राला मोबाईल द्यायचा आहे, अशी थाप रिक्षा चालकाने तिला मारली. त्यानंतर पूर्व द्रुतगती मार्गावरून घाटकोपर वर्सोवा लिंक रोडवर जागृती नगर मेट्रो स्थानकाजवळ रिक्षा आणली. बाजूलाच उभ्या असलेल्या बसच्या मागे नेऊन तो बळजबरी करू लागला. तिने याला प्रतिकार केला असता रिक्षाचालकाने तिला जबर मारहाण केली. या मारहाणीत तरुणीचा दातही तुटला.