Fri, Jul 19, 2019 01:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोखाड्यातील ११ पाड्यांत अद्याप वीज नाही

मोखाड्यातील ११ पाड्यांत अद्याप वीज नाही

Published On: Apr 30 2018 4:09PM | Last Updated: Apr 30 2018 4:09PM मोखाडा : हनिफ शेख

देशातील प्रत्येक गावात वीज पोहचली असे ट्वीट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले यानुसार प्रत्येक गाव पावर ग्रीडशी जोडले गेले असून, आता प्रत्येक गावात वीज पोहचणार असल्याचे सांगितल्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनी अभिनंदन केले, मात्र मोखाडा सारख्या अतिदुर्गम भागातील गाव म्हणता येणार नसले तरी तब्बल ११ पाड्यांना आजवर वीज पोहचलेली नसून, देशाच्या विकास प्रवाहात हे पाडे येत नाहीत काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

पंतप्रधानाच्या ट्वीट नंतर देशातील पूर्वोत्तर भागातील एक दुर्गम गाव वीज ग्रीडला जोडल्यानंतर हे या ग्रीडला जोडण्यात आलेले शेवटचे गाव ठरले. यामुळे वीज जोडणीचे हे अभियान वेळेपेक्षा १२ दिवस आधीच पुर्ण केल्याचे सांगण्यात आले आहे मात्र मोखाडा तालुक्यातील गावपाड्यांतील तब्बल ११ पाडे आहेत, यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील कोलेधव (लोकसंख्या ३०),बेरीस्ते मधील वांगणपाडा ( लोकसंख्या ७१), चिकाडीचापाडा (लोकसंख्या ६८) ,जांभळीचापडा (५१ ) ,हिरवे पिंपळपाडा ग्रामपंचायत मधील रूईचापाडा तसेच खोडाळा विभागातील तुळ्याचीवाडी, जंगलवाडी, वंगनपाडा, किनिस्ते पैकी पोर्‍याचापाडा ,भैरोबाची वाडी आणि गणेश वाडी हे पाडे आजही वीजे अभावी अंधारात चाचपडत आहेत. असे असताना देशातील प्रत्येक गावात वीज पोहचली हे सांगण्याची घाई कसली झालीय हा प्रश्न याठिकाणी आता उपस्थित होत आहे.

महावितरण मोखाडा यांच्याकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यातील कोलेधव हा पाडा अतिदुर्गम असल्याने तिथे वीजेचे खांब पोहचविणे कठीण असल्याने त्याठीकाणी सोलर ने वीज देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, तर बाकी पाड्यांसाठी वीज जोडणीचे प्रस्ताव पाठवलेले असुन, लवकरच काम सुरू होईल मात्र या ११ पाड्यांशिवाय खोडाळा भागातील आमले येथे वीजेचे खांब पोहचलेत मात्र वीज नाही अशीच परीस्थिती आहे. आसे पंचायत मधील बिवलपाडा याठीकाणी वीजेचे खांब आहेत मात्र वीज अद्याप नाहीच हे विशेष.यामुळे प्रत्येक गाव वीज ग्रीडने जोडले गेले म्हणजे सर्वच नागरीकांना वीज मिळणार असा होत नसला तरी मग देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पासून सव्वाशे किलोमीटर वरील या पाड्यांची ही अवस्था असेल तर देशातील अनेक पाड्यांतील परीस्थिती कशी असेल याचा अंदाज लावला जावू शकतो. यामुळे सर्वच गावात वीज पोहचली अशी घोषणा करूनही जर हे पाडे वर्षानुवर्षे अंधारातच चाचपडत राहीले तर मग हे केवळ पोकळ घोषणांचेच सरकार ठरू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.