Tue, Nov 13, 2018 10:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बचावासाठी तीन मजली इमारतीवरून ‘तीने’ मारली उडी

बचावासाठी तीन मजली इमारतीवरून ‘तीने’ मारली उडी

Published On: Apr 06 2018 1:16PM | Last Updated: Apr 06 2018 1:32PMनालासोपारा : (रुतिका वेंगुर्लेकर)

नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी परिसरात एका १२ वर्षीय मुलीने स्वरक्षणासाठी  तीन माजली इमारतीवरून उडी घेऊन आपला बचाव केला. सध्या सदरच्या मुलीवर नायर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती सुधारत आहे. तुळींज पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सदर घटनेचा तपास करत आहेत.

अलकापुरी परिसरात राहणारी १२ वर्षीय मुलगी आपल्या घरातून इमेटेशन ज्वेलरीचा माल आणण्यासाठी निघाली होती. याच परिसरात असणाऱ्या आर. के. कॉलेज नावाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ती गेली होती. ती अचानक वरून आरडा ओरडा करू लागली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. तिला उडी मारू नको असे सांगू लागले. पण ती कुणाचे ऐकत नव्हती. याच इमारतीच्या खाली रिक्षाला हूड बसविण्याचा कारखाना आहे. येथील लोकांनी तिला उडी मारताना हूड मध्ये झेलले आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ती त्यात गंभीर जखमी झाली आणि तिला उपचारासाठी नायर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. तिच्या कमरेला जबर मार लागला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तुळींज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के डी कोल्हे यांनी सांगितले की  मुलीचा जबाब नोंदवताना तिने पोलिसांना, तिच्यावर कुणीतरी जबरदस्ती करत असल्याने बचावासाठी उडी घेतल्याची माहिती दिली. मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी पोस्को गुन्हा दाखल केला आहे.