होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुंगीचे औषध पाजून आठ महिने अत्याचार

गुंगीचे औषध पाजून आठ महिने अत्याचार

Published On: Dec 29 2017 1:46AM | Last Updated: Dec 29 2017 1:46AM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तब्बल पाचजणांनी गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी एका महिलेसह तीन नराधमांना अटक केली आहे. दोन नराधम फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. छाया अर्जुन नाईकडे (45), अजय पातरकर (22), हरिशचंद्र गंगाराम गायकवाड (50), दशरथ पुंज मोखरे अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. विशेष म्हणजे या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या महिलेने पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेवून हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, कल्याण तालुक्यातील म्हारळगाव परिसरातील चाळीत पीडित तरुणी आई वडिलांसोबत राहत होती. तिच्या आई-वडिलांमध्ये मतभेद झाल्याने पीडितेच्या वडिलांनी दुसरे लग्न करून सावत्र आई आणली. अशातच तिच्या सख्ख्या आईचे अलिबाग येथील मामाच्या गावी आजाराने निधन झाले. पीडित तरुणीचा तिची सावत्र आई नेहमीच छळ करत असे. याबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितले असता वडिलांनी तू कमवून तुझा उदरनिर्वाह कर, असे सांगितल्याने पीडित तरुणी आठ महिन्यांपूर्वी टिटवाळा रेल्वे स्टेशनला आली.

याठिकाणी तिला तोंडओळखीची एक महिला भेटली. या महिलेकडे संपूर्ण हकीकत सांगितल्यावर आपल्याला भाड्याने रूम पाहिजे म्हणून सांगितले. यावर तिने पीडितेला आपल्या घरी नेले आणि दुसर्‍या दिवशी त्या महिलेच्या मुलीसोबत मुख्य आरोपी छाया अर्जुन नाईकडे हिच्याकडे आली. तिलाही सर्व घटना सांगितल्यानंतर नाईकडे या महिलेने आपल्यालाही एकच मुलगा आहे, मुलगी नाही.

मी तिचा मुलगी म्हणून सांभाळ करते, असे बोलून तिने  पीडितेला इंदिरानगर येथील मस्जिद परिसराजवळील एका चाळीत भाड्याची खोली घेऊन दिली. तेथेच आरोपी महिलेच्या बहिणीचा मुलगा अजय पातरकर व हरिश्चंद्र गायकवाड राहण्यास होते. दुसर्‍या दिवशी छाया नाईकडे हिने पीडित तरुणीस जबरदस्तीने दारू पाजून रात्री 12 च्या सुमारास रिक्षाचालक हरिश्चंद्र गायकवाड यास बोलवून तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. यामुळे पीडित तरुणीला अत्याचाराचा त्रास असह्य होऊ लागल्याने तिला एका खासगी दवाखान्यात नेऊन उपचार करून पुन्हा घरी आणण्यात आले. त्यानंतर आरोपी महिलेने सतत डॉक्टरने गोळ्या दिल्याच्या नावाखाली पीडित तरुणीला रात्रीच्या वेळी गुंगी आणणार्‍या गोळ्या दिल्या आणि याचा फायदा घेत तिच्यावर अजय पातारकर या नराधमाने बलात्कार केला. 

या गुन्ह्याच्या आधारे टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी मुख्य आरोपी छाया अर्जुन नाईकडे, अजय पातरकर, दशरथ पुंज मोखरे, हरिश्‍चंद्र गंगाराम गायकवाड या चार आरोपींना शिताफीने अटक केली. त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या गुन्ह्यातील दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.