Sun, Jul 21, 2019 12:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नोकरशाहीवर मंत्रिमंडळ संतप्त

नोकरशाहीवर मंत्रिमंडळ संतप्त

Published On: Apr 18 2018 2:01AM | Last Updated: Apr 18 2018 2:01AMमुंबई : दिलीप सपाटे 

मंत्र्यांनी घेतलेले निर्णय अधिकारी अडवित आहेत. सरकारचे जीआर आम्हाला प्रसिध्द झाल्यानंतरच कळतात. मंत्र्यांनी सांगितलेली कामेही होत नसतील तर हे सरकार मंत्री चालवतात की अधिकारी ते सांगा, असा संतप्त सवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरिष्ठ मंत्र्यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. या नाराजीनंतर अधिकार्‍यांनी मनमानी थांबली नाहीतर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोरील विषय संपल्यानंतर मंत्र्यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी त्याची सुरुवात केल्याचे समजते. मंत्री निर्णय घेतात पण सचिव आणि अधिकारी हे त्यावर अंमलबजावणी करीत नाहीत. आमच्या निर्णयांच्या फायली अडवितात. त्यांना सांगितलेली कामे करीत नाहीत. उलट सरकारचे निघणारे जीआर हे आम्हाला प्रसिध्द झाल्यानंतरच कळतात. त्यामुळे हे सरकार अधिकार्‍यांचे आहे की मंत्र्यांचे असा सवाल रावते यांनी मुख्यमंत्र्यांना केला. त्याला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही पाठींबा दिला. आपण यापूर्वीही मंत्री म्हणून काम केले आहे. परंतु, एवढे मस्तवाल अधिकारी आपण पाहीले नाहीत. अधिकारी मंत्र्यांना जुमानत नसतील तर मंत्री म्हणून काम कसे होणार, असा सवाल कदम यांनी केला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही  अधिकार्‍यांमुळे सरकारच्या गतीमानतेवर परिणाम होत असल्याचा आरोप केला. 

पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनीही आपली नाराजी उघड केली. मंत्री म्हणून आम्ही फिरत असलो तरी अधिकार्‍यांच्याच हाती कारभार आहे. कोणत्याही अधिकार्‍यांना काम सांगितले तर ते दाद देत नसल्याचे जानकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. विशेषत: महसूल, पाणीपुरवठा, वित्त, पर्यावरण आदी विभागाच्या सचिवांच्या विरोधात नाराजीचा जास्तच सूर होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर अधिकारी ऐकत नसल्याची कबुलीच सुरुवातीला दिली होती. मात्र,  मंत्री मात्र अजूनही प्रशासनाच्या वारुला नियंत्रित करु शकले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची नाराजी ऐकून घेतल्यानंतर अधिकार्‍यांना वर्तन सुधारण्याची तंबीच दिली.