Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मतांसाठी पैसे वाटप ही तर शिवसेनेचीच कार्यपद्धती : रविंद्र चव्हाण

मतांसाठी पैसे वाटप ही तर शिवसेनेचीच कार्यपद्धती : रविंद्र चव्हाण

Published On: May 25 2018 9:26PM | Last Updated: May 25 2018 9:26PMपालघर : पुढारी ऑनलाईन

पालघर पोटनिवडणुकीत मतदारांना पैसे वाटप केल्याबाबत शिवसेनेने भाजपवर केलेला आरोप पुर्णत: खोटा असून पैसे वाटप करताना पकडलेला कार्यकर्ता हा भाजपचा नसल्याचा खुलासा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. याउलट मतांसाठी पैसे वाटणे ही शिवसेनेचीच कार्यपद्धती असल्याचा प्रतिआरोप त्यांनी केला. 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाच शुक्रवारी डहाणूमधील रानशेत या गावात मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच पैसे वाटप करताना पकडलेली व्यक्ती ही भाजपचा कार्यकर्ता असल्याचा धादांत खोटा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या आरोपाबाबत खुलासा करताना चव्हाण म्हणाले की, ज्या व्यक्तीकडे पैसे सापडले आहेत, तो माणूस भाजपचा नाही हे आपण खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. 

तसेच अशा पद्धतीने पैसे वाटप ही भाजपची संस्कृती नाही. आम्ही विकासाचे राजकारण करतो, त्यामुळे पैसे वाटण्याची वेळ भाजपवर कधीच येत नाही. त्यामु‌ळे पैसे वाटप करणारी व्यक्ती भाजपची नाही, हे आपण शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगू शकतो. उलट मतदानासाठी पैसे देणे ही शिवसेनेचीच कार्यपद्धती आहे, असा प्रतिआरोप त्यांनी केला. 

मतांसाठी पैसे वाटणे ही शिवसेनेचीच कार्यपद्धती असून मी स्वत: साक्षीदार आहे. कल्याण लोकसभा निवडणूकीत जेव्हा दिवंगत वसंत डावखरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारकीचे उमेदवार होते, तेव्हा उल्हासनगर निवडणुकीत अशाच स्वरूपाची एक ध्वनिचित्रफित दाखवून त्यांची बदनामी करण्यात शिवसेनेचाच हात होता. तसेच २०१४ सालीही मनसेचे राजू पाटील लोकसभा निवडणुकीत उमेदवार होते. त्यावेळीही त्यांच्या भावाची अशाच पद्धतीची एक बनावट ध्वनीचित्रफित दाखवून शिवसेनेने त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले होते. त्याची आम्हा सर्वांना आणि अगदी प्रसारमाध्यमांनाही कल्पना आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आरोपावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. आता या निवडणुकीत भाजपचे पारडे जड दिसू लागल्याने शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे चव्हाण म्हणाले.

Tags : palghar by election, ravindra chavan, BJP, shivsena,  money