Wed, Feb 19, 2020 09:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाद लावून राजकीय पोळी भाजण्याचा कट : आठवले

वाद लावून राजकीय पोळी भाजण्याचा कट : आठवले

Published On: Jan 02 2018 9:56PM | Last Updated: Jan 02 2018 9:56PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या निरपराध आंबेडकरी जनतेवर झालेल्या  हल्ल्याचा तीव्र निषेध करून  हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी. आंबेडकरी जनतेवर भीमा कोरेगाव येथे झालेला हल्ला हा दलित मराठा वाद पेटवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे.  दलित मराठा दोन्ही समाज छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहेत. एकमेकांशी लढून ताकद वाया घालवू नका. या दोन्ही समाजाने शांतता आणि संयम पाळून  दलित मराठा संघर्षाचा कट उधळून लावावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  केले आहे.

उद्या बुधवार  दि.3 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत सर्व पोलिस ठाण्यांवर भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली आहे. आज दि. २ जानेवारी रोजीही रिपाइंतर्फे सर्वत्र स्वयंस्फुर्तपणे बंद पुकारण्यात आला. घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्या रिपाइं कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.  

भीमा कोरेगाव हल्ल्याच्या आडून दलित मराठा वाद पेटविण्याचा कट रिपाइं उधळून लावेल. या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. हल्लेखोरांना शोधून काढा त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे, अशी मागणी रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.