Thu, May 28, 2020 10:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुटखा बंदीचे उल्लंघन केल्यास ३ वर्षे सक्तमजुरी

गुटखा बंदीचे उल्लंघन केल्यास ३ वर्षे सक्तमजुरी

Published On: Mar 07 2018 12:02PM | Last Updated: Mar 07 2018 12:02PMमुबंई : प्रतिनिधी

राज्यात गुटखा बंदी असली तरी त्या संदर्भातील कायद्यात असलेल्या त्रुटींमुळे त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. हे लक्षात घेता गुटखा बंदीचं उल्लंघन केल्यास तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि या संदर्भातील गुन्हे अजामीनपात्र करण्याची तरतूद नव्याने कायद्यात करण्यात येईल अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी विधानपरिषदेत केली.

राज्यात गुटखा, सुगंधी सुपारी यावर बंदी असतानाही खुलेआम त्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. वारंवार एकाच भागात जर अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच गुन्हेगारांना जरब बसेल अशी कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य सदस्यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून केली. त्यावर उत्तर देताना मंत्री बापट यांनी कायद्यात आवश्यक सुधारणा केल्या जातील. तसेच ज्या अधिकाऱ्यांडून गुन्हेगारांना पाठीशी घातले जात असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या संदर्भातील प्रकरणाची चौकशी आवश्यकता भासल्यास सीआयडीकडे सोपविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.