Sun, May 26, 2019 10:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंबेनळी बस दुर्घटना : ३० मृतदेह बाहेर काढले, शोधकार्य थांबले

आंबेनळी बस दुर्घटना : ३० मृतदेह बाहेर काढले

Published On: Jul 29 2018 8:03AM | Last Updated: Jul 29 2018 2:37PMपोलादपूर : प्रतिनिधी 

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून शनिवारी सकाळी झालेल्या अपघातातील ३० मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी नातेवाईकांचा आक्रोश रुग्णालयासमोर सुरूच होता. मृतदेह काढण्यास विलंब होत असल्याने नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली होती. काल मिळालेल्या माहितीनुसार ३४ प्रवासी बसमध्ये होते, असे सांगण्यात आले होते. मात्र आता नव्याने आलेल्या माहितीनुसार बसमध्ये ३१ प्रवासी होते. त्यातील १ बचावला आणि ३० मृत्यूमुखी पडले आहेत. पहिल्यांदा ३४ लोक सहलीला जाणार होते. दोघांनी आयत्या वेळी सहलीला येणार नसल्याचे सांगितले. तर, बसमधील एकाने उडी मारल्याने या अपघातातून तीन लोकांचा जीव वाचला आहे. आता शोधकार्य थांबवल्याचे प्रशासनाने सांगितले. 

दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी वर्गाची वर्षा सहल घेऊन जाणारी बस आंबेमाची आणि दाभिळ गावाजवळ दरीत कोसळली होती. या भीषण अपघातात ३० जण जागीच ठार झाले. मृतदेह ८०० फूट खोल दरीत असल्याने तसेच पाऊस आणि दुर्गम भाग असल्याने मृतदेह काढण्यात अडचणी येत आहेत. सह्याद्री ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी सहापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढल्यानंतर अपघातस्थळी पोहोचलेल्या एनडीआरएफच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. 

पहिले काही मृतदेह बाहेर काढल्यानंतर रात्रीची वेळ असल्याने तसेच भाग दुर्गम असल्याने शोधकार्याचा वेग मंदावला होता. चौदा मृतदेह दरीतून काढल्यानंतर पंधरावा मृतदेह बाहेर काढण्यास तब्बल सहा तासांचा अवधी लागला. रात्री १२ वाजता पंधरावा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर साधारणपणे १ तासानंतर सोळावा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले होते. 

रायगड पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर आणि महाड प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार हे सुद्धा परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर पोलादपूर येथील कार्यकर्त्यांसमवेत दरीतून बाहेर काढलेले मृतदेह रूग्णवाहिकेद्वारे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्यासाठी स्वतः मेहनत घेतली. पोलादपूर, महाड, खेड, महाबळेश्वर, वाई येथील अनेक सेवाभावी संस्था आणि कार्यकर्ते घटनास्थळी रात्रभर मदतीसाठी झटत होते.

आतापर्यंत विक्रांत शिंदे, संतोष झगडे, निलेश तांबे, राजू रिसबुड, प्रशांत भांबेड, रत्नाकर पागडे, पंकज कदम, प्रमोद शिगवण, सतीष झगडे, सुनील कदम, राजाराम गावडे, सचिन झगडे, प्रमोद जाधव, रितेश जाधव, विनायक सावंत, संदीप सुर्वे, सुनील साठले, राजेंद्र बंडवे, सुयश बाळ यांचे मृतदेह पहाटेपर्यंत काढण्यात आले. 

एनडीआरएफने रात्री सहा मृतदेह बाहेर काढले. अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे हे स्वतः तहसिलदार शिवाजी जाधव यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन पाहत आहेत. आमदार राजन दळवी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कदम, आमदार भरत गोगावले यांच्यासह रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण अपघातस्थळी आले असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.