Sun, Aug 25, 2019 19:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘दूध बंद’चे रणशिंग; सांगलीत टँकर फोडला

‘दूध बंद’चे रणशिंग; सांगलीत टँकर फोडला

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:43AMमुंबई ः प्रतिनिधी

दुधाला लिटरमागे पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी दूध बंद आंदोलन सुरू केले आहे. खासदार राजू शेट्टी यांनी रात्री सहकार्‍यांसह पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या चरणी दुधाचा अभिषेक घालून आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनांचे नेते सज्ज झाले आहेत. आंदोलनाची परिणामकारकता वाढविण्यासाठी मुंबईचा दूध पुरवठा रोेखला जाणार असून, त्यासाठी नेते स्वत:च नाकाबंदीत उतरले आहेत. गुजरातहून येेणारे दूध रोखण्यावर त्यांचा भर आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर नेर्लेजवळ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडले.

शेजारच्या कर्नाटक व गुजरात राज्यातील दूध उत्पादकांना ज्याप्रमाणे त्यांच्या खात्यावर थेट अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही दूध उत्पादकांच्या खात्यावर लिटरमागे थेट पाच रुपये अनुदान जमा करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यातील दूध उत्पादकांनी बेमुदत दूध बंद आंदोलन पुकारले आहे. राज्यात एकूण दीड कोटी लिटरवर दुधाचे संकलन होते. त्यातील बहुतांश दूध रोखण्याची उपाययोजना नेत्यांनी केली आहे. तर सरकारी पातळीवरून दूध उत्पादकांना मदत म्हणून निर्यात होणार्‍या दूध भुकटीला किलोमागे 50 रुपये अनुदान, तर निर्यात होणार्‍या दुधाला लिटरमागे पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या राष्ट्रांना भारत मदत करतो, त्यांना मदतीऐवजी दूध पावडर देण्यात यावी व शालेय पोेषण आहारातही दूध पावडरचा समावेश करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचे मान्य करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणाही केली.

त्यानंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम  राहिले. त्या पार्श्‍वभूमीवर काही दूध संघ प्रतिनिधींनी बैठक घेऊन गायीच्या दूध दरात लिटरमागे तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय पुण्यात जाहीर केला. मात्र, तो निर्णय संघाला कळला नसल्याचे स्पष्ट करून ‘गोकुळ’ने आपले संकलन बंद राहणार असल्याचे जाहीर केले. खा. राजू शेट्टी यांनी आंदोलनात फूट पाडण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून, आंदोलनावर आपण ठाम असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी बैठका सुरू असून, दूध संघांनींही दूध उत्पादकांच्या संतप्त भावनांची दखल घेत आंदोलनाला पाठिंबा म्हणून दि. 16 जुलै रोेजी एक दिवसाचे दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यादिवशी रात्री दुधाचे टँकर्सही मुंबईला पाठविले जाणार नाहीत.

आम्ही चर्चेला तयार; पण सरकारची तयारी नाही : शेट्टी

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारशी चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे सांगून राजू शेट्टी म्हणाले की, सरकार मात्र आमच्याशी चर्चा करायला तयार नाही. त्यामुळे आमचे काहीच बिघडणार नाही. कारण सरकारकडे चर्चा करण्यासाठी बरेच बडेबडे शेतकरी नेते आहेत, तसेच दूध उत्पादकांचेही नेते आहेत. त्यामुळे चचेर्र्ची दारे उघडी नाहीत, याचा दोष आपल्यावर येत नाही. सरकारला चर्चाच करायची नाही, हेच यातून स्पष्ट होत असून आम्ही आंदोलनावर ठाम आहोत.

सरकारने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. आंदोलन दडपण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.

मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील तिसर्‍यांदा आमदार झाल्यानिमित्त खा. राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच शेतकर्‍यांवर दूध बंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आंदोलनाच्या माध्यमातून मुंबई आणि इतर ठिकाणी गुजरातमधून येणारे दूध अडविण्यात येणार आहे. दूध उत्पादनाचा प्रतिलिटर खर्च 35 रुपयांवर गेला असताना शेतकर्‍यांनी पंधरा रुपये लिटर दराने दूध का विकायचे, असा सवालही राजू शेट्टी यांनी केला.

सांगलीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला

सांगली जिल्ह्यात दूध दर आंदोलनाची ठिणगी पडली. राष्ट्रीय महामार्गावर नेर्लेजवळ मुंबईला जाणारा खासगी संघाचा दूध टँकर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फोडला व दूध सोडून दिले. संपूर्ण जिल्ह्यात दूध बंद आंदोलन आक्रमकपणे करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो लिटर दूध संकलन ठप्प राहणार आहे. सरकारने पोलिसी बळाच्या जोरावर आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला.

ही बैठक सांगलीतील संघटनेच्या कार्यालयात रविवारी झाली. बैठकीला विकास देशमुख, संजय बेले, महावीर पाटील, सयाजी मोरे, संदीप राजोबा, वैभव चौगुले, भागवत जाधव, जयकुमार कोले, अभिजित पाटील उपस्थित होते.
गुजरातहून मुंबईला येणारे

दूध अडविणार

मुंबईत महाराष्ट्रातून दूध येणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी जिल्हाजिल्ह्यातील कार्यकर्ते सज्ज असून, आपण आ. हितेंद्र ठाकूर व कपिल पाटील, माजी खासदार बळीराम जाधव यांच्यासह गुजरातेतून महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत दूध येऊ नये, याची काळजी घेणार आहोत.

मुंबईला दूध कमी पडू देणार नाही ः जानकर यांची ग्वाही

सरकारने दोन दिवस मुंबईत दूध पुरवठा कमी पडणार नाही, याची दक्षता घेतली आहे. तर रविवारी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मुंबईला दूध कमी पडू दिले जाणार नाही, अशी सरकारच्या वतीने ग्वाही दिली.
दरम्यान, ‘गोकुळ’नेही सोमवार दि. 16 रोजी दूध संकलन बंद ठेवण्याचा व त्यादिवशी मुंबईला दूध न पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी सांगितले.

शेतकरी संतप्त : विनायकराव पाटील

काही खासगी संघांनी लिटरमागे तीन रुपये वाढ देण्याचे ठरविले असले, तरी त्यांचे दूध खरेदी दर मुळातच कमी असल्याचे सांगून विनायकराव पाटील यांनी शेतकरी त्यांच्या खात्यावर थेट अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले. जोवर शेतकर्‍यांना थेट अनुदान मिळणार नाही, तोवर शेतकर्‍यांच्या संतप्त भावना कशा थांबविणार, असा सवालही त्यांनी केला.

तोटा भरून द्या : डॉ. नवले

राज्य सरकारने गायीच्या दुधाला लिटरमागे 27 रुपयांचा भाव निश्‍चित केला आहे. तर राज्यात दूध संघांकडून 17 रुपये दराने दुधाची खरेदी सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निश्‍चित केलेला दूध दर व प्रत्यक्ष मिळणारा दर यातील फरकाची लिटरमागे 10 रुपयांची रक्‍कम सरकारने थेट दूध  उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी भारतीय किसान सभेचे प्रमुख डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

अमरावतीत टँकर जाळण्याचा प्रयत्न 

अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या टँकरला जाळण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी हा टँकर अडवला, स्वाभिमानीचे झेंडे फडकावले, दुधाच्या टँकरचे टायर फोडून ते पेटवले. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली. अमरावती-नागपूर रस्त्यावर वरूड गावाजवळ ही घटना घडली.

पुण्यात दुधाची नियमित आवक अपेक्षित

दूध आंदोलनाच्या पार्श्‍वभूूमीवर पुणे शहरात सोमवारी दुधाची नियमित आवक अपेक्षित असून टंचाई जाणवणार नसल्याचे दुग्ध वर्तुळातून सांगण्यात आले. तसेच प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयाने पोलिस बंदोबस्तात दूध आणण्यासाठी सहकारी दूध संघांना मदत दिल्याचे सांगण्यात आले. शहराला 15 लाख लिटरइतक्या दुधाची गरज असते. यातील दूध रविवारी रात्री उशिरापर्यंत शहरात आल्यामुळे उपलब्धता चांगली राहणार असल्याचे सांगण्यात आले.