Mon, Mar 25, 2019 02:55
    ब्रेकिंग    



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दूध आंदोलन Live : राज्यात चक्‍काजाम, जनावरांच्या गळ्यात मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या

दूध आंदोलन Live : राज्यात चक्‍काजाम, जनावरांच्या गळ्यात मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या

Published On: Jul 19 2018 9:20AM | Last Updated: Jul 19 2018 1:28PM



मुंबई : पुढारी ऑनलाईन 

शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढवून देण्यात यावे यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलन आता चिघळले आहे. मध्यरात्री दुग्धविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर स्‍वाभिमानी आंदोलनावर ठाम असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगतिले. सरकार दुधाबाबत ठाम निर्णय घेणार नाही तोपर्यंत राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

दूध आंदालन तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावरे रस्त्यावर आणावीत असे आवाहनही खासदार शेट्टी यांनी केले आहे. सरकार जर शेतकर्‍याविरोधात भूमिका घेणार असेल तर आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Live update : 

कोल्‍हापूर : किणी टोल नाक्यावर चक्काजाम, आंदोलन पोलिसांनी रोखले, कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये वादावादी, काही लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वाखरी येथे  शेकडो जनावरांसह शेतकरी रस्त्यावर

पंढरपूर : प्रतिनिधी

राज्यभर सुरू असलेल्या दूध दराच्या आंदोलनास पंढरपूर तालुक्यात ही मोठा प्रतिसाद मिळत असून आज ( बुधवारी ) वाखरी येथे चक्का जाम आंदोलनासाठी शेकडो जनावरे पालखी मार्गावर आणून बांधली गेली. तसेच शेकडो शेतकऱ्यांनीही रस्त्यावर ठिय्या मारून सरकारचा निषेध केला आणि दुधाला दर वाढवून देण्याची मागणी केली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सकाळी वाखरी येथील पालखी तळ चौकात जनावरे आणून बांधली गेली. बैलगाड्या, बैल, गायी, म्हशी रस्त्यावर बांधल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेकडोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर बसून होता. सुमारे २ तास  पालखी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

विटा : खानापूर तालुक्यातील बलवडी (ता. खानापूर) येथील फाटयावर, बलवडी, जाधवनगर येथील  शेतकरी संघटनेने रस्तावर दूध ओतले भिलवडी व कुंडलकडे जाणाऱ्या गाड्या रोकल्या व गाड्यातील दूध रस्तावर ओतले, दूध आंदोलनाची तीव्रता वाढली

सोलापूर : जनावरांच्या गळ्यात मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या

मंगळवेढा : प्रतिनिधी

राज्यात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या दूध दराच्या आंदोलनाची धग कमी होत नसून शेतकरी आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेढा सांगोला मार्गावर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपली जनावरे रस्त्यावर आणली आहेत. विशेष म्हणजे या जनावारांच्या गळ्यात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या नावाच्या पाट्या अड़कवल्याने या आंदोलनात शेतकरी किती सक्रिय झाले आहेत हे बघायला मिळत आहे. 

सकाळी १० वाजल्यापासून तालुक्यातील आंधळगाव हे सोलापूर ते सांगली या मार्गावरील मंगळवेढा तालुक्यातील गाव आहे. गेल्या अर्ध्या तासापासून रास्ता रोको केल्याने हां मार्ग ठप्प झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना प्रहार या पक्ष संघटनां या रास्तां रोकोमध्ये सहभागी आहेत. शेतकरी चक्का जाम करून ठाण मांडून बसले आहेत तर कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही आहे आमच्या हक्काच् नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत आहेत. पोलिस प्रशासन या ठिकाणी हजर असून परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

सोलापूर : जनावरांच्या गळ्यात मंत्र्यांच्या पाट्या मंगळवेढ्यात रास्ता रोको 

सांगली : आरवडे येथे दूध आंदोलन भडकले ,चितळे डेअरीला जाणारी गाडी फोडली, पंधराशे लिटर दूध रस्त्यावर

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातून येणारी दूधाची आवक घटली

सोलापूर : वैराग-माढा रस्त्यावर चक्काजाम आंदोलन, वाहतूक ठप्‍प

सातार्‍यातील माण तालुक्‍यात रास्‍तरोको

बुलढाण्यात दूध आंदोलन चिघळले, बस फोडली

कराड : चक्काजाम आंदोलनापूर्वीच आंदोलकांसह स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात (video)

कराड : प्रतिनिधी 

तीन दिवसाच्या आंदोलनानंतरही राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका न घेतल्याने कराड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी सकाळी स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. घरातून ताब्यात घेत पोलिसांनी नलवडे यांना पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.

वाठार, करवडी, केसे यासह कराड तालुक्यातील विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून दूध संकलन जवळपास पूर्णपणे ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे. मंगळवारी रात्री वाठार येथे शेतकऱ्यांनी आक्रमक होत रस्त्यावर दूध ओतले होते. तर करवडीत शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळ करून शासनाचा निषेध नोंदवला होता. त्यामुळे आता तालुक्यात आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे

औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर चक्काजाम आंदोलन 

वडीगोद्री (मराठवाडा) : प्रतिनिधी 

वडीगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या चक्का जाम आंदोलनात बैलगाडी सह दुभती जनावरे आंदोलन स्थळी बांधण्यात आली होती. दूध दरासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आज चौथ्या दिवशी भडका उडाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे दि. १९ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या चक्का जाम आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस व प्रहार संघटना यांनी पाठींबा दिला आहे.

सरकारचे शेतकरी विरोधी धोरण शेतकऱ्यांबद्दलची अनास्था व शहरी भागातील मतदारांच्या हितासाठी जाणूनबुजून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे.राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर५ रु अनुदान सरकारने थेट बँक खात्यावर द्यावे. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या अन्यथा शांतता पूर्ण मार्गाने सुरू असणारे हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे सरकार ला देण्यात आला आहे. एक तास चक्का जाम केल्यानंतर मंडळ अधिकारी तांबोळी यांना निवेदन देऊन आंदोलन थांबवण्यात आले.