Thu, May 23, 2019 05:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दूधबंद आंदोलन कुणाच्या पथ्यावर?

दूधबंद आंदोलन कुणाच्या पथ्यावर?

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:27AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

दूध बंद आंदोलनाचा थेट परिणाम मुंबई शहरात दररोज होणार्‍या लाखो लिटर दुध व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. मुंबईकराची गैरसोय होऊ नये तसेच दुधाच्या ब्रँडमध्ये मोठी स्पर्धा असल्याने आपले ग्राहक तुटू नयेत यासाठी गोकुळसह राज्यातील दूध उत्पादक संघांनी एक दिवस आणखी पुरेल एवढे दूधसाठा पाठवण्याची तयारी केली आहे. मात्र आंदोलन चिघळल्यास गुजरातच्या अमूल, नंदिनी, दुधासह अन्य राज्यातील दूध पोलीस बंदोबस्तामध्ये मुंबईत आणण्याची व्यवस्था सरकारकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात दररोज पॅकिंगमध्ये 50 लाख लिटर दुधाची विक्री होते. त्यात सर्वाधिक दूध गुजरातच्या अमूलचे 12 लाख लिटर दूध विक्री होते. त्या खालोखाल कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या गोकुळ ब्रँडचे दूध सात ते साडे सात लाख दूध विक्री होते. कोल्हापूरच्या वारणाची विक्री 2 लाख लिटर आहे. सातारा फलटण येथील गोविंदच्या दुधाची विक्री 50 हजार आहे. मुंबईतील दुधाचा ब्रँड असलेल्या महानंदाची विक्री अडीच लाख लिटर आहे. दिल्लीतील मदर डेअरीचे दूध अडीच लाख लिटरच्या आसपास जाते. याशिवाय राज्यातील जिल्ह्यामधून राजनन्दन, पंजाबसिंध, सोनाई, शिवनेरी, प्रभात, कृष्णा या नावाने दूध बाजारात उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त 400 ब्रँड असल्याची माहिती दूध विक्रेत्याकडून देण्यात आली. तसेच  मुंबईच्या आसपासच्या तबेल्यातील 10 लाख लिटर दूध मुंबईकरांपर्यंत पोहचते. 

विशेष म्हणजे कर्नाटकमधून येणार्‍या नंदिनी या दुधाने गेल्या सहा महिन्यात मुंबईच्या  दूध व्यवसायात आपले हातपाय रोवण्याचा प्रयत्न केला असून, सध्या सरासरी 1 लाख लीटर दूधाची बाजारात विक्री होत आहे.  तसेच ज्या कर्नाटकच्या मुद्यावर दूध बंद आंदोलन करण्यात येत आहे त्या कर्नाटकच्या नंदिनी या दुधाच्या लिटरमागे मुंबईत विक्री करणार्‍या दूध विक्रेत्यांना इतरांच्या तुलनेत सर्वाधिक कमिशन म्हणजे लिटरमागे 4 रुपये मिळत आहेत. त्यातून मुंबईच्या बाजारात नंदिनीचा हळूहळू खप वाढताना दिसत आहे.  

गुजरामध्ये यापूर्वी महानंदाला विरोध झाला होता. या दुधाला गुजरातमध्ये मागणी होती. त्यानुसार सात वर्षापूर्वी सुरत आणि अहमदाबाद येथे नवीन लाँचिंग करण्यात येणार होते. परंतु तेथील शेतकरी दूध विक्रेते यांनी महानंदच्या स्टॉलची तोडफोड केली. त्यामुळे आज महानंदची गुजरातमधील दूध विक्री रोखली गेली होती. मात्र आज गुजरातचा ब्रँड असलेले अमूल दूध  हे मुंबईत पहिल्या क्रमांकावर आहे.