होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चेन मार्केटींग, पैसे दामदुप्पट प्रकरणात सुमोटो गुन्हे दाखल करा : गृहराज्यमंत्री

चेन मार्केटींग प्रकरणात सुमोटो गुन्हे दाखल करा : गृहराज्यमंत्री

Published On: Mar 09 2018 12:36PM | Last Updated: Mar 09 2018 12:36PMमुबंई : प्रतिनिधी

राज्यात चेन मार्केटींगच्या नावाखाली विविध प्रकारची प्रलोभने दाखवून आणि घरबसल्या लाखो रुपयांचा आर्थिक फायदा मिळवून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार मागील काही महिन्यांत वाढले आहे. हे लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी चेन मार्केटिंग किंवा अशा प्रकारच्या जाहिराती कुठे करण्यात येत असल्याचे आढळल्यास पोलिसांना सुमोटो गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश पुन्हा नव्याने देण्यात येतील अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. गेल्या दोन वर्षात साधारणता 14 हजार 967 आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे स्पष्ट करत त्यांनी अशा प्रकरणात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण  कायद्यानुसार (एमपीआयडी) कारवाई करण्याचा विचार करण्यात येत असल्याचे सांगितले.

क्यू-नेट मार्केटिंग या कंपनीने राज्यातील गुंतवणूकदारांची फसवणूक करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. विविध प्रकारच्या योजनांद्वारे दामदुप्पट परताव्याची आमिष दाखवून नंतर पळ काढणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून केली. भाजपचे भाई गिरकर, जयंत पाटील आदी सदस्यांनी आर्थिक फसवणुकीचे असे प्रकार टाळण्यासाठी पोलीस तसेच संबंधित अन्य विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री पाटील यांनी क्यू-नेट मार्केटिंग संदर्भात राज्यात सहा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 30 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारचे फसवणूकीचे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना तसेच बँकांना आवश्यक सूचना देण्यात येतील, असे ते म्हणाले.

क्यू-नेट मार्केटिंग या हॉगकाँग बेस कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याबाबत विविध ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार राज्यात तसेच देशभरात एकूण 35 गुन्हे दाखल करून कंपनीचे संचालक आणि भागधारकांच्या बँक खात्यातुन 144 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ज्या वेबसाईटवरुन व्यवसाय सुरू होता ते संकेतस्थळ न्यायालयाच्या परवानगीने बंद करण्यात आल्याची माहीती गृहराज्यमंत्र्यांनी दिली.