Fri, May 24, 2019 21:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुयारी मेट्रो ६० वर्षांपूर्वीच धावली असती !

भुयारी मेट्रो ६० वर्षांपूर्वीच धावली असती !

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 12:22AM

बुकमार्क करा

मुंबई : राजेश सावंत

मुंबईत झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेऊन, बेस्टने प्रवासी वाहतुकीसाठी 1956 मध्येच मोनोरेलसह एरीयल रोपवे, वॉटर बस व भुयारी रेल्वेचा (सध्याचा भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प) पर्याय तत्कालिन राज्य सरकारला दिला होता. यापैकी भुयारी रेल्वेचा अभ्यास करून योजनाही तयार करण्यात आली. पण या प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यास राज्य सरकारने नकार दिल्याने ही योजना बारगळली. अन्यथा 60 वर्षापूर्वीच मुंबईत भुयारी मेट्रो धावली असती. 

मुंबईत मोनोरेलसह भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाने वेग घेतला आहे. मात्र या प्रकल्पाची संकल्पना जुनीच आहे. 1941 मध्ये मुंबईची लोकसंख्या अवघी 14 लाखांच्या घरात होती. पुढील दहा वषार्ंत ती 28 लाखांवर गेली. 1970 मध्ये शहरातील लोकसंख्येने 56 लाखांचा पल्ला गाठला. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रवासी वाहतुकीवर ताण पडू लागला. त्यामुळे बेस्टने भुयारी रेल्वेसह मोनोरेल, एरीयल रोपवे व वॉटर बस ही प्रवासी साधने उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे तत्कालिन राज्य सरकारला पटवून सांगितले. 

मुंबईत भुयारी रेल्वे बांधण्याचा विचार प्रथम 1924 मध्ये झाला. मुंबई सेंट्रल, उभा पारशी, जे. जे. हॉस्पिटल, पायधुनी, क्रॉफर्ड मार्केट, बोरीबंदर (सध्याचे सीएसटी स्टेशन) मरीन लाईन्स, चर्नीरोड, केनेडी ब्रिज अशी वर्तुळाकार रेल्वे असावी, अशी संकल्पना होती. पण ही संकल्पना कागदावर उतरलीच नाही. त्यानंतर तब्बल 30 वर्षानंतर म्हणजेच 1954 मध्ये भुयारी रेल्वेचा बेस्टने राज्य सरकारकडे प्रस्ताव ठेवला. पण अवाढव्य खर्चामुळे ही योजना पुढे सरकली नाही. मुंबईत भुयारी मार्ग उभारण्यासाठी मध्य व पश्‍चिम रेल्वे अधिकार्‍यांसोबत बेस्ट समिती सदस्य, महापालिकेचे अभियंता यांच्यात चर्चा झाली. यावेळी मुंबईतील भूगर्भाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे काम ‘हिगाशी अँड त्सुजी’ या जपानी तज्ज्ञ कंपनीकडे सोपवण्यात आले.

या कंपनीचा अहवाल आल्यानंतर बेस्ट महाव्यवस्थापकांनी महम्मद अली रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड या मार्गे म्युझियमपासून दादरपर्यंत भुयारी रेल्वे बांधण्याची योजना तयार केली. यासाठी राज्य सरकारकडे अर्थसहाय्य मागण्यात आले. मात्र त्याला नकार मिळाल्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळू शकली नाही. 1962 व 1964 पुन्हा भुयारी रेल्वेसाठी बेस्टने प्रयत्न केले. पण भांडवली गुंतवणुकीच्या अभावी भुयारी रेल्वेची चर्चाच थांबली. याच काळात मोनोरेलचाही अभ्यास करण्यात आला. पण त्या काळात युरोपमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यात मोनोरेलसाठी पुरेसे अर्थसहाय्य राज्य सरकार द्यायला तयार नसल्यामुळे बेस्टने या योजनेचाही नाद सोडून दिला.