Fri, Jul 19, 2019 20:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगा हाल

मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगा हाल

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 12:38AMमुंबई : प्रतिनिधी

रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आदींच्या देखभालीसाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे लोकलच्या अनेक फेर्‍या रद्द करण्यात आल्या असतानाच रेल्वेचे वेळापत्रकही विस्कळीत झाल्याने रविवारी रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल झाले. पश्‍चिम, मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर या चारही रेल्वेमार्गांवरील ब्लॉकचा एकत्रित परिणाम झाल्याने प्रवाशांना दिवसभर प्रचंड त्रासास सामोरे जावे लागले.

पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेवर रविवारी सकाळपासूनच मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. पश्‍चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 15.35 या काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात आला. या काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरून जाणार्‍या सर्व लोकल जलद मार्गावरून चालवण्यात आल्याने प्रवाशांना  अडचणींचा सामना करावा लागला. 

मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा या स्थानकांच्या दरम्यान सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 या काळात मेगाब्लॉक घेण्यात आला. ब्लॉकच्या काळात कल्याण स्थानकातून सकाळी 10.37 पासून दुपारी 3.56 या काळात अप जलद मार्गावर सुटणार्‍या सर्व उपनगरीय सेवा दिवा आणि परळ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात आल्या, तर हार्बरवरील सेवा पाच तासांसाठी खंडित ठेवण्यात आली. त्यामुळे इथल्या हजारो प्रवाशांना रस्तेमार्गे कुर्ला, वाशी ते पनवेलपर्यंतची स्थानके गाठावी लागली. 

हार्बरच्या प्रवाशांना वळसा घालून मध्य रेल्वेवर यावे लागत असल्याने या मार्गावरील नेहमीच्या प्रवासीसंख्येतही भर पडली होती. पुढील लोकल केव्हा येईल याची शाश्वती नसल्याने प्रत्येक प्रवासी स्थानकात आलेल्या लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत होते. सकाळी 11 नंतर ब्लॉकचे काम सुरू झाले आणि मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर, पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना त्याची झळ बसत गेली.