Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीची बैठक निष्फळ

एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीची बैठक निष्फळ

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 1:13AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

कॉस्ट टू कंपनी (सीटीसी) अंतर्गत कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी व रजारोखीकरणाची रक्कम एसटीनेच भरावी, असा हेका कामगार संघटनेने कायम ठेवल्यामुळे राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसाठीची बैठक निष्फळ ठरली. प्रशासनाने वेतननिश्‍चिती सुत्र धुडकावल्यामुळे संतप्त झालेल्या कामगार संघटनेच्या नेत्यांनी एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासोबत पुन्हा बैठक लावण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कामगारांच्या पगारवाढीचा करार करण्याबाबत चालढकल करत असल्याचे सांगुन रावते यांनी कर्मचार्‍यांसाठी 4849 कोटी रुपयांची नुकतीच पगारवाढ जाहीर केली होती.  पण ही वाढ मान्य नसल्यामुळे 8 व 9 जून रोजी कामगारांनी घोषित संप केला होता. संपामुळे प्रवाशांचे झालेले हाल विचारात घेऊन उध्दव ठाकरे यांनी मध्यस्थ करत रावते यांना कामगार संघटनेसोबत चर्चा करण्यास सांगितले होते. 

परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंग देओल, महाव्यवस्थापक माधव काळे, वित्तीय सल्लागार अशोक फळणीकर, मुख्य कामगार अधिकारी प्रताप पवार व महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे नेते संदीप शिंदे या बैठकीला उपस्थित होते.

मान्यताप्राप्त संघटनेच्या या भूमिकेवर अन्य कर्मचारी संघटना संतापल्या आहेत. कामगार नेते श्रीरंग बरगे म्हणाले, मान्यताप्राप्त संघटनेच्या आडमुठेपणामुळे 27 महिने झाले तरी वेतनकरार होत नाही. वाटाघाटी समितीसोबत आतापर्यंत 33 वेळा बैठका झाल्या आहेत. आता कामगारांच्या सहनशिलतेचा अंत जवळ आला आहे. रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ प्रशासनाने तातडीने लागु करावी, या मागणीसाठी गुरुवारी बारा संघटनांच्या नेत्यांची तातडीची बैठक आयोजित केली आहे.