Sat, May 25, 2019 23:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठीच्या मुद्द्यावर सत्तेत येता येणार नाही!

मराठीच्या मुद्द्यावर सत्तेत येता येणार नाही!

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 1:20AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

स्थानिकांच्या कल्याणासाठी मराठीचा मुद्दा लावून धरणार्‍या राज ठाकरे यांना चक्क मनसेच्या नेत्यांनीच मराठीच्या मुद्द्यावर सत्तेत येता येणार नाही, असे खडे बोल सुनावल्याचे समजते. मात्र, आपला मुद्दा चुकीचा असल्याचे बोलणार्‍या या नेत्यांना तुम्हीच मराठीचा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरला आहात, अशा शब्दांत राज यांनी फटकारले.

वांद्रे येथील एमआयजी क्‍लबमध्ये बुधवारी सुमारे दीड तास राज आणि मनसे नेते व सरचिटणीस यांच्यात बैठक झाली. पक्षाला लागलेल्या गळतीपासून ते अमित ठाकरेंचा राजकारणप्रवेश अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक निवडणुकीत येणारे अपयश, नेते आणि पदाधिकार्‍यांकडुन सोडचिठ्ठी दिली जात असताना आपण गप्प बसत आहात. पक्ष सोडणार्‍यांना आपणाकडुन थांबवण्याचा प्रयत्न होत नाही. पक्ष कमकुवत होऊ लागल्यामुळे प्रसारमाध्यमांनी आपल्याला चर्चा-कार्यक्रमांसाठी बोलावणे थांबवले आहे.

राज्यात शेतकरी व महिलांवर अन्याय होत असताना आपली शेतकरी सेना व महिला सेना काय काम करीत आहे, हे समजत नाही, अशी चिंता काही नेत्यांनी व्यक्त केली. दुसर्‍या फळीतील अनेक नेत्यांनी आपल्या मनातील गेल्या अनेक वर्षांपासुनची खदखद बाहेर काढल्यामुळे बाळा नांदगावकरही मागे राहीले नाही. पक्षात असाच गोंधळ होत असल्यास आपण नेते पदाचा राजीनामा देतो. आयुष्यभर राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करीत राहिन, अशा शब्दात नांदगावकर यांनी नाराजी बोलुन दाखवल्याचे समजते.

आपले नेतेच आपल्याला सुनावत असल्याचे पाहुन राज यांनीही फटकारे देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, तुम्हा नेत्यांना मराठीचा मुद्दा किती पटलाय, ते सांगा. माझा मुद्दा किंवा अन्य भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यात तुम्ही अपयशी ठरले आहात. इतर पक्षांप्रमाणे आपल्या पक्षाचे प्रवक्ते स्वतः पत्रकार परिषद का घेत नाहीत. जळगावचे नगरसेवक पक्ष सोडुन का गेले, याचा जबाब मला मिळाला पाहीजे.

राज ठाकरे यांनी काहीसा राग देत आपल्या नेत्यांना सबुरीचाही सल्ला दिला. ते म्हणाले, भाजपचा ईव्हीएममुळे विजय झाला आहे. यापुढे मोदी पंतप्रधान होणार नाहीत. येत्या 2 वर्षात मनसेची कार्यालयाची स्वतःची इमारत असेल. एखादा मुद्दा प्रभावीपणे मांडा. मीडियाशी चांगले संबंध ठेवा आणि 2014 ची निवडणूक आता डोक्यातून काढून टाका.दुसर्‍या पक्षाच्या नेत्यांसमोर वाकू नका. भविष्यकाळ आपलाच असेल, अशा शब्दात राज यांनी आपल्या नेत्यांना धीर देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मात्र, राज आणि नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली नसल्याचे सांगितले. या बैठकीत नेते आणि राज ठाकरे यांच्यात पक्षविस्ताराबाबत चर्चा झाली. पदाधिकार्‍यांनी काही अडचणी सांगितल्यावर राज यांनी मागर्दशन केले, असे ते म्हणाले.