Mon, Jun 24, 2019 21:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापौर म्हणतात, पाणी तुंबले नाही, साचले

महापौर म्हणतात, पाणी तुंबले नाही, साचले

Published On: Jun 09 2018 1:57AM | Last Updated: Jun 09 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी 

पावसाच्या चार सरींनी गुरूवारी मुंबई तुंबवली. रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. पण हे मानायला मुंबईचे प्रथम नागरिक महापौर तयारच नाहीत. म्हणे.. मुंबईत पाणी तुंबले नाही, तर साचले. या वक्तव्याची काँग्रेसने याचा खरपूस समाचार घेतला आहे. महापौरांचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेनेचे अपयश लपवण्याचा केविलवाणी प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.

मुंबई शहर व उपनगरात गुरूवारी पावसाच्या अवघ्या चार सरीने मुंबईचे जनजिवनच विस्कळीत करून टाकले. ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे बेस्ट सेवेसह अन्य वाहतूकीवर मोठा परिणाम झाला. याकडे शुक्रवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे लक्ष वेधले असता, मुंबईत पाणी तुंबले नाही तर, साचल्याचे अजब उत्तर दिले. पावसाच्या मोठ्या सरी पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले. पहिल्या पावसात पाणी तुंबणारच,  याचा अर्थ पाणी तुंबून राहिले असा होत नाही. पाणी तुंबू नये यासाठी महापालिकेची आपत्कालिन यंत्रणा सतर्क आहे. त्यामुळे मंगळवारच्या पावसात साचलेल्या पाण्याचा काही मिनिटात निचरा झाला, असेही महापौरांनी सांगितले. महापौरांच्या या व्यक्तव्याचा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 

मेट्रोच्या कामामुळे पाणी तुंबणार असा दावा करणार्‍या महापौरांनी हिन्दमाता व शहरातील अन्य भागात तुंबलेल्या पाण्याबद्दल बोलावे. मंगळवारचा पाऊस हा चित्रपटाचा ट्रेलर होता. चित्रपट अजून बाकी असून याचा अनुभव लवकरच महापौरांनाच नाही तर पालिकेच्या सत्तेत बसलेल्या शिवसेनेलाही येईल. नालेसफाई झालीच नाही हे सर्वांनाच माहित आहे. पण रस्त्या लगतच्या गटारातीलही गाळ उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे हिन्दमाता, सायनसह अन्य भागात पाणी तुंबले. एवढेच नाही तर, दादरच्या पारसी कॉलनीतही यंदा कधी नव्हे ते पाणी तुंबले. 

सहाय्यक आयुक्तांशी चर्चा करणार

मुंबईतील नालेसफाई व अन्य कामांचा आढावा घेण्यासाठी आपण बुधवारी सर्व सहाय्यक आयुक्त यांच्याशी चर्चा करणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. शहरात पाणी साचू नये, यासाठी काही उपाययोजना अंमलात आणता येतील का ? याचा अभ्यास करण्यात येणार आहे. मात्र सकल भागात साचणार्‍या पाण्याबाबत काहीच करता, येणार नसल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.