Mon, May 20, 2019 10:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापौर निवासस्थानावरून सेना अस्वस्थ

महापौर निवासस्थानावरून सेना अस्वस्थ

Published On: Jun 12 2018 1:57AM | Last Updated: Jun 12 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी 

शिवाजीपार्क येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना लवकरच रिकामा करावा लागणार आहे. पण महापौरांना साजेसा असा नेमका कोणता बंगला द्यायचा यावर अद्यापपर्यंत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा महापौर निवासस्थानाचा प्रश्न स्थायी समितीत उपस्थित करून, महापौरांना निवासस्थान मिळणार का? असा सवाल प्रशासनाला केला आहे.

महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आला आहे. हा बंगला तातडीने विद्यमान महापौर विश्‍वनाथ महाडेश्वर यांना रिकामा करावा लागणार आहे. पण महापौर दर्जाला साजेसा असा बंगला पालिकेकडे नाही. त्यामुळे शिवसेनेने मलबार हिल येथील प्रवीण दराडे व डॉ. पल्लवी दराडे राहत असलेला पालिकेचा बंगला रिकामा करण्याची मागणी गेल्या सहा महिन्यापासून लावून धरली आहे. पण हा दराडे पती-पत्नींना हा बंगला 2028 पर्यंत राज्य सरकारच्या आदेशानुसार देण्यात आल्यामुळे यावर पालिका प्रशासन बोलण्यास तयार नाही. याबाबत सोमवारी स्थायी समितीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी विचारणा केली. दराडे यांचा बंगला का रिकामा केला जात नाही. महापौरांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ लोटूनही पालिका प्रशासन त्यांच्या निवासस्थानाची सुविधा उपलब्ध करून देऊ शकली नाही. 

पालिका कर्मचार्‍यांच्या निवृत्ती नंतर त्यांचे सेवा निवासस्थान तातडीने खाली केले जाते. मग पालिकेतून बदली झालेल्या अतिरिक्त आयुक्तांचे निवास्थान का रिकामे केले जात नाही, असा सवाल राऊत यांनी केला. यावर भाजपाने अधिकार्‍यांच्या जिमखान्यासाठी राखीव असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्स येथील भूखंडावर महापौरांसाठी अलिशान बंगला बांधण्यात यावा, असे मत मांडून शिवसेनेची मागणी अयोग्य असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. भाजपाच्या या गुगलीला प्रतित्तर म्हणून सभागृह नेत्या राऊत यांनी महालक्ष्मी रेसकोर्सवर तातडीने बंगला बांधण्यास पालिकेकडे जादूची कांडी नाही. महालक्ष्मी येथे बंगला बांधा. पण तत्पूर्वी महापौरांचे निवासस्थान मलबार येथील दराडे कुटुंबियांच्या बंगल्यात हलवण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी लावून धरली. मात्र यावर उत्तर देण्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी टाळले.