होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महालक्ष्मी जिमखान्याच्या जागेत महापौर बंगला उभारा!

महालक्ष्मी जिमखान्याच्या जागेत महापौर बंगला उभारा!

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी 

मलबार हिल येथील पालिकेच्या अलिशान बंगला महापौरांच्या निवासस्थानासाठी मिळावा यासाठी शिवसेना आग्रही आहे. पण या बंगल्यात राहणार्‍या भाजपाच्या खास गोटातील सनदी अधिकार्‍यांना हटवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाने महालक्ष्मी येथे अधिकार्‍यांना जिमखान्यासाठी देण्यात येणार्‍या जागेतच महापौर बंगला उभारावा, असा आग्रह धरून, शिवसेनेशी नवा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला आहे. 

मलबार हिल येथे पालिकेचा अलिशान बंगला राज्य शासनात कार्यरत असलेले सनदी अधिकारी प्रवीण दराडे व डॉ. पल्लवी दराडे यांना बहाल करण्यात आला आहे. हा बंगला दराडे पती-पत्नी सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांच्याकडे राहिल, असे पत्रच राज्य सरकारकडून पालिकेला पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे दराडे पती-पत्नींना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आर्शिवाद असल्याचे बोलले जात आहे. पण महापालिकेचा बंगला राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकार्‍यांना देण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेनेसह काँग्रेसने केली आहे. त्यानुसार बंगला खाली करण्याची पालिकेकडून दराडे यांना नोटीस देण्यात आली. पण पुन्हा राज्य सरकारने पालिका आयुक्तांवर दबाव आणून हा बंगला खाली करू नये, असे आदेश दिले आहेत. 

महापौरांचे निवासस्थान या अलिशान बंगल्यातच व्हावे, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. त्यामुळे दराडे पती-पत्नींना बंगला खाली करणे भाग पडणार आहे. पण भाजपाला दराडे यांना त्याच बंगल्यात सेवानिवृत्तीपर्यंत ठेवायचे आहे. त्यामुळे बुधवारी अधिकार्‍यांच्या जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजूरीसाठी आला असता, भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी जिमखान्याची जागा महापौर निवासस्थानासाठी राखीव करण्याची मागणी केली. मलबार हिल व राणीबागेतील बंगल्यापेक्षा महालक्ष्मी मध्यवर्ती येत असल्यामुळे ही जागा महापौर बंगल्यासाठी योग्य असल्याचे स्पष्ट केले. यावर सभागृह नेते यशवंत जाधव भाजपाची ही खेळी आमच्या कधीच लक्षात आली आहे. महापौरांना निवासस्थान मिळवून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. महापौर बंगला हा मलबार हिल येथील पालिकेच्या बंगल्याच होणार असेही जाधव यांनी स्पष्ट केले.