Tue, Apr 23, 2019 21:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहीद पत्नींना एसटीचा मोफत प्रवास

शहीद पत्नींना एसटीचा मोफत प्रवास

Published On: Jan 21 2018 2:49AM | Last Updated: Jan 21 2018 1:38AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी  महामंडळात नोकरी आणि त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करून देणार्‍या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळात नोकरी उपलब्ध करून देणार्‍या बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. 

विमानतळाच्या धर्तीवर राज्यात 15 ठिकाणी अत्याधुनिक सोयी- सुविधांनीयुक्त बस पोर्ट उभी केली जाणार आहेत. त्यापैकी पनवेल बस पोर्टच्या कामाचे भूूमिपूजन देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी युवतींना एसटी चालकपदासाठी प्रशिक्षण व नियुक्ती देण्याच्या योजनेचाही शुभारंभ करण्यात आला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एसटी महामंडळ आता आपला चेहरामोहरा बदलत आहे. महामंडळाने सुरू केलेले विविध लोकोपयोगी उपक्रम खूप कौतुकास्पद आहेत. नक्षलग्रस्त तरुणांच्या पुनर्वसनासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेली बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना फार महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी आहे. सर्व लोकोपयोगी निर्णय पूर्णत्वास नेल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे कौतुक केले.

पूर्वी घाणीची साम्राज्ये असलेली एसटीची स्थानके  तसेच एसटीच्या बसेस आता बदलत आहेत. लालपरी, शिवशाहीसारख्या अत्याधुनिक बसेस आता किफायतशीर दरात सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होत आहेत. एसटी महामंडळाने यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. आदिवासी, समर्पण केलेले नक्षलग्रस्त तरुण, आपत्तीग्रस्त शेतमजूर, शहीद जवानांच्या पत्नी यांच्यासाठी महामंडळाने सुरू केलेल्या योजनाही त्यांच्या जीवनात परिवर्तन आणणार्‍या आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.