Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत विवाहितेवर रॉकेल ओतून पेटवले

भिवंडीत विवाहितेवर रॉकेल ओतून पेटवले

Published On: May 01 2018 1:39AM | Last Updated: May 01 2018 1:28AMभिवंडी : वार्ताहर

लग्नाला दहा महिने झाले तरी पत्नी गर्भवती राहून तिला बाळ होत नाही, या रागातून पती व दोघी नणंदेने विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळल्याची घटना रहेमतपुरा, शांतीनगर येथे शनिवारी रात्री घडली आहे. अमिना नसरुद्दीन खान (21) असे या विवाहितेचे नांव आहे. तिच्यावर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. 

सदर तरुणीचे 10 महिन्यांपूर्वीच नसरुद्दीन याच्याशी लग्न झाले आहे. मात्र दहा महिने होऊनही ती गर्भवती राहून बाळाला जन्म देत नाही यावरून पती नसरुद्दीन, नणंदा जरीना व ताहिरा या तिघांनी संगनमताने तिला वारंवार शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देवून छळ सुरु केला होता. शनिवारी रात्री याच कारणावरून भांडण करून हाताच्या चापटीने मारहाण करून नणंद ताहिरा हिने अमिना हिच्या अंगावर रॉकेल ओतले. तर जरीना हिने भाऊ नसरुद्दीन यास आगपेटीच्या काडीने पेटवून देण्यास सांगितले.

आगीच्या भडक्यात सापडलेली अमिना जीव वाचवण्यासाठी टाहो फोडत होती. त्यावेळी शेजार्‍यांनी धाव घेवून तिला प्रथम स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र ती 48 टक्के जळाल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पती नसरुद्दीन खान (28), नणंद ताहिरा (24) व जरीना या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत नसरुद्दीन व ताहिरा या दोघांना अटक केली आहे. त्यांना रविवारी न्यायालयाने 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai, mumbai news, Bhiwandi, married woman, Burned,