Mon, Jun 17, 2019 03:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई बंद : ठाण्यात आंदोलनाला हिंसक वळण

मुंबई बंद : ठाण्यात आंदोलनाला हिंसक वळण

Published On: Jul 25 2018 1:29PM | Last Updated: Jul 25 2018 1:22PMठाणे : प्रतिनिधी 

मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात सकाळपासूनचा मराठा आंदोलनाचा जोर दिसून आला.  ठाण्यात आंदोलनाला सकाळपासूनच हिंसक वळण लागले.  वागळे  इस्टेट आणि वर्तक नगर परिसरात आंदोनकर्त्यानी   ठाणे  परिवहनच्या बसेसवर  दगडफेक करून ४  बसेसची तोडफोड केली. तर नितीन कंपनीजवळ देखील एक बस फोडण्यात आली. त्यानंतर  आंदोलकांनी मजीवाडा ब्रिजवर  टायर जाळले.   

ठाणे रेल्वे स्थानक आणि स्टेशन  परिसराला  कार्यकर्त्यांनी विशेष टार्गेट केले.  शेकडो निदर्शकांनी  प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ५ येथे रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला.  पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर पाच ते सहा मिनिटात रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. मात्र टीएमटी आणि ऑटो सेवा  काही काळ कारकर्त्यानी बंद केल्या. आंदोलनाला घाबरून ठाण्यातील पेट्रोल पंप देखील बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. जांभळी  नाका, मुख्य बाजारपेठ, चरई, आंबेडकर रोड या परिसरात  उघडलेली दुकाने देखील जबरदस्तीने बंद करण्यात आली. 

शहरात सकाळी ८ वाजल्यापासूनच मराठा समाजचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे कोपरी पूल पूर्णपणे काही वेळ जाम होता. रिक्षा नसल्याने प्रवाशांचे देखील चांगलेच हाल झाले . अर्चना मुलिक (वय ३८)  या प्रवासी महिलेला गावंदेवी  मार्केट येथे  तासभर प्रतीक्षा करावी लागली.  अखेर रिक्षावाल्याना मारहाण होत असल्याचे प्रकार बघून आपण थेट घराचा रस्ता  पकडला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच रिक्षा  आंदोलनकर्त्यांकडून थांबवण्यात येत होत्या त्यामुळे सर्व रिक्षा स्टॅन्ड खाली होते तर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी शहरातील मॉलकडे देखील आपला मोर्चा वळवला होता. 

"आम्ही सर्व पोलिस कर्मचार्यांना अधिक सावध राहण्यासाठी चेक पॉईंटवर सतर्क केले आहे.  आजूबाजूच्या लोकांच्या गाड्यांवर, दुकानांवर  दगडफेक  काही  तक्रारी आल्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.   मात्र अफवा पसरवत असलेल्या लोकांवर कारवाई करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर खटले दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.   मराठा निदर्शकांनी मात्र हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेला नकार दिला आहे.

मराठा समाजातील निदर्शकांपैकी एक वामन काळे म्हणाले, हिंसाचाराच्या घटनांशी आमचा काहीही संबंध नाही. आमचे निषेध शांत निषेध आहे, आणि शांततेत आंदोलन करणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले .