Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'मराठा आरक्षणासाठी आता गनिमीकावा'

'मराठा आरक्षणासाठी आता गनिमीकावा'

Published On: Jun 05 2018 6:34PM | Last Updated: Jun 05 2018 6:05PMमहाड  : श्रीकृष्ण द.बाळ.  

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील मराठा समाजाने उभारलेल्या आंदोलनाकडे व शांततेच्या मोर्चाकडे शासनाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही छत्रपती शिवरायांच्या गनिमी कावा पद्धतीने होणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला. ते आज पाचाड येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी समन्वयकांच्या विशेष बैठकी प्रसंगी बोलतत होते. यावेळी रमेश केरे पाटील म्हणाले की, राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा विनाविलंब करावी,  अशी मागणी केली असून सध्या राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला मराठा क्रांती मोर्चाचा संपूर्ण पाठिंबा राहील अशी घोषणा केली आहे. 

 

 दोन वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आज पाचाड येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळाजवळ  असणार्‍या रायगड जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये मोर्चाच्या राज्यव्यापी जिल्हानिहाय समन्वयक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पुढील भविष्यकालीन रणनीतीबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. या राज्यव्यापी बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, रवींद्र काळे पाटील, प्रा. माणिकराव शिंदे पाटील, महेश राणे महेश डोंगरे रामभाऊ गायकवाड यांसह राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमधून प्रमुख समन्वयक पदाधिकारी हजर होते. 

आपल्या घणाघाती भाषणामध्ये आवास पाटील यांनीही मराठा समाजाने शांततेमध्ये असलेली ताकदही संपूर्ण राज्याला दाखवून दिली असून  याची जाणीव महाराष्ट्र शासनाने ठेवली नसल्याचा आरोप केला. यापुढील काळात मराठा समाज थंड बसणार नसून तो गुंड बनू शकतो याकडे शासनाने लक्ष द्यावे असा त्यांनी सूचक इशारा त्यांनी दिला. यामुळे समाजाची शांततेची भूमिका  संपली असून पुढील होणाऱ्या सर्व परिणामांना महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असे स्पष्ट करून आजवर मराठा समाजाने अठरा पगड जातीच्या सर्व समाज व धर्मातील बांधवांना मानाचे स्थान दिले असून यापुढे मराठा समाजातील तरुणांनी एकजूट व एकसंघ होऊन पुढील निर्णायक लढ्यासाठी तयार रहावे, असे आवाहन त्यांनी केले. 

या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ समन्वयक रमेश केरे पाटील यांनी शासनाच्या शेतकऱ्यांविषयीच्या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त करून सध्या राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाविषयी शासनाची भूमिका दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या असलेल्या कर्जाविषयी बोलताना सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी प्रशासनाने केलीच पाहिजे,  अशी आग्रही भूमिका मांडून आगामी काळात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मराठा क्रांती मोर्चा त्यांच्या संपूर्ण पाठीशी राहील अशी घोषणा केली.  श्री रवींद्र काळे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या राणे कमीशन ने दाखल केलेल्या अहवालाबाबत  शासनाकडून आवश्यक असलेली अंमलबजावणी झाली नसल्याचे स्पष्ट करून याबाबत शासन चालढकल करीत असून नव्याने सुरू केलेल्या चौकशी अहवालाबाबत यांनी आश्चर्ययुक्त संताप व्यक्त केला .शासनाने राज्यातील मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये असे स्पष्ट करून आगामी काळात अत्यंत जलद गतीने शासनाने मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली.

प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील यांनी शासनाच्या मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात असलेल्या पाच कोटी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाची उदासीनता घातक असल्याचे मत व्यक्त करून घ्या मराठा मोर्चाची दखल संपूर्ण जगाने घेतली त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला . आगामी काळात सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी प्रत्येक मराठी बांधवांनी आता संताजी धनाजी ची भूमिका बजवावी असे त्यांनी आवाहन केले .  या प्रसंगी सर्वश्री महेश राणे महेश डोंगरे रामभाऊ गायकवाड यांसह रेखा वाकडे यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त करून मराठा समाजाच्या न्याय भूमिका व मागणीकडे शासनाने वेळकाढूपणाचे धोरण न स्वीकारता त्वरित निर्णय घ्यावा अशी सूचना केली. या बैठकीपूर्वी उपस्थित सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकारी व समन्वयकांनी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या समाधीस्थानी जावून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले .