Tue, Mar 26, 2019 01:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा क्रांती संघटना स्थापणार नवा पक्ष 

मराठा क्रांती संघटना स्थापणार नवा पक्ष 

Published On: Aug 26 2018 12:29PM | Last Updated: Aug 26 2018 12:03PMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील सर्व मराठा व समविचारी संघटनांना एकत्र घेऊन मराठा क्रांती संघटना लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही या पक्षाच्या वतीने लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, यासाठी सर्व संबंधित संघटनांशी आपले बोलणे झाले आहे व त्यांनीही असा पक्ष स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. मात्र तेवढ्यावरच न थांबता येत्या दि. 1 सप्टेंबरपासुन राज्यभर दौरा करून आपण सर्व मराठा व समविचारी संघटनांच्या प्रतिनिधीना भेटणार आहोत.त्यांच्याशी चर्चा करून व त्यांना विश्‍वासात घेउनच पुढील कृती केली जाणार आहे.

31 सप्टेंबरला पक्षाची प्रतापगडावर स्थापना त्यानंतर येत्या दि. 31 सप्टेंबर रोजी या पक्षाची घोषणा सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रतापगडावर करण्यात येणार आहे. जवळपास 26 संघटनांच्या प्रमुखांना भेटून पक्षाचे धोरण ठरविण्यात येणार असल्याचही सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले.

पाच विषयांना न्याय मिळविणार 50 टक्के महिला उमेदवार देणार सर्व समाजाला एकत्र घेऊन आरक्षण, संरक्षण, शिक्षण, रोजगार आणि उद्योग या पाच विषयावर न्याय मिळविण्यासाठी नवीन पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. या नवीन पक्षातुन येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र उमेदवार देण्यात येणार आहेत. यात महिलांना 50 टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थापन झालेला नवीन पक्ष कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही अथवा सहकार्य करणार नाही. अशी भुमिका सुरेश पाटील यांनी मांडली. यावेळी परेश भोसले, मोहन मालवणकर, नितीन लायकर, राजु दबडे, गोपाळ दळवी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.