Thu, Nov 15, 2018 07:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पर्रीकर पुन्‍हा लिलावतीत; अमेरिकेत घेणार उपचार?

पर्रीकर पुन्‍हा लिलावतीत; अमेरिकेत घेणार उपचार?

Published On: Mar 05 2018 1:09PM | Last Updated: Mar 05 2018 1:33PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी पुन्‍हा मुंबईतील लिलावती रुग्‍णालयात दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. डॉक्‍टरांच्या सल्‍ल्यानुसार ते पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता असल्याचे त्यांचे स्‍वीय सचिव रुपेश कामत यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी पर्रीकर यांच्या पोटात दुखत असल्याने ते गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्‍णालयात (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पुढील उपचार मुंबईतील लिलावती रुग्‍णालयात घेतले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते अर्थसंकल्‍पीय अधिवेशनासाठी थेट गोवा विधानसभेत दाखल झाले. यावेळी त्यांनी अर्थसंकल्‍पही मांडला. 

मात्र, परत त्यांना डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना पुन्‍हा गोमेकॉ रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. तेथून आज, सोमवारी त्यांना पुन्‍हा मुंबईतील लिलावती रुग्‍णालयात दाखल केले आहे. 

पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाणार

मुख्यमंत्री पर्रीकर यांना आज लिलावती रुग्‍णालयात दाखल केले आहे. मात्र, पुढील उपचार करण्यासाठी ते अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. डॉक्‍टरांच्या सल्‍ल्यानुसार ते अमेरिकेला जाणार असल्याची माहिती त्यांचे स्‍वीय सचिव रुपेश कामत यांनी दिली आहे. 

मुख्यमंत्रिपदाचा तात्‍पुरता पदभार कोणाकडेही नाही

मुख्यमंत्री पर्रीकर यांना उपचारासाठी पुन्‍हा रुग्‍णालयात दाखल केल्याने मुख्यमंत्रिपदाचा कारभार दुसर्‍या मंत्र्याकडे देणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडेही दिली नसून सर्वच मंत्र्यांना काही रकमेपर्यंत खर्चाचे अधिकार दिल्याचे सूत्रांकडून समजली आहे.