होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीतील पुरुषाला स्तनाचा कर्करोग : प्रकृती स्थिर

डोंबिवलीतील पुरुषाला स्तनाचा कर्करोग : प्रकृती स्थिर

Published On: Feb 26 2018 1:16AM | Last Updated: Feb 26 2018 1:01AMडोंबिवली : वार्ताहर

साधारणतः पुरुषांमध्ये दुर्मिळ मानला जाणारा स्तनाचा कर्करोग हा डोंबिवलीतील एका रुग्णामध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्करोगावर उपचारासाठी डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयामध्ये रुग्ण तपासणीसाठी दाखल झाला होता. तपासणी केल्यावर त्याला स्तनाचा कर्करोग झाला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या मुख्य व्यवस्थापिका शीतल चौगुले यांनी दिली.

प्रामुख्याने महिला रुग्णांमध्ये स्तनाचा कर्करोग आढळतो. मात्र, हजारो रुग्णांमधून एखाद्याच पुरुषाला कर्करोग झाल्याचे आढळते, असे चौगुले यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर एम्स रुग्णालयाने तपासणी शिबीर सुरू केले आहे. कर्करोग दिनाच्या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी सुरू करण्यात आली. येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत शिबीर सुरू राहणार आहे. 

या शिबिरात पुरुष रुग्णांसाठी सीबीसी, किडनी प्रोफाईल, सोनोग्राफी, सिरम पीएसए (40 वर्षांवरील) छातीचा एक्सरे आणि कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला दिला जाईल. तर महिलांसाठी सीबीसी, छातीचा एक्स-रे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी आणि कॅन्सर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर पुढील तपासणी व शस्त्रक्रियांसाठी 40 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने जाहीर केले आहे.