Sat, Jul 20, 2019 09:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माझी बदली करा : ठाणे पालिका आयुक्तांची विनंती

माझी बदली करा : ठाणे पालिका आयुक्तांची विनंती

Published On: Dec 23 2017 2:33AM | Last Updated: Dec 23 2017 1:29AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

गेले तीन वर्षे ठाण्यात विकासकामांचा धडाका लावणारे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यांची बदली व्हावी यासाठी स्वतःहून शासनाला विनंती केल्याची  माहिती  शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण  सभेत स्वत:च  दिली.

 गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या क्लिपमुळे व्यथित झालेल्या जयस्वाल यांनी सभागृहात अतिशय भावनिक विचार व्यक्त केले. मी गेले तीन वर्षे शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला असून आता ठाणेकरांमध्येही माझे रिपोर्ट कार्ड तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ठाणे महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत टीडीआर घोटाळा गाजला होता. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण विकासकाला पुन्हा सुधारित विकास प्रस्ताव पाठवण्यासाठी पत्र देण्यात येईल अशी माहिती सभागृहात दिली होती. यावर व्यवस्थित आणि अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी खुद्द पालिका आयुक्त संजीव जयस्वाल सभागृहात उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त सव्वा तास विस्ताराने बोलले. 

मी कोणाचे कधीच नुकसान केले नाही.  मधल्या काळात काही तांत्रिक बाबींमुळे काही नगरसेवकांचे पद रद्द झाले होते. मात्र, ते केवळ कायद्यानेच झाले आहे. प्रशासनाला कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. या सभागृहात मला लोकप्रतिनिधींचे प्रेमच मिळाले आहे. मात्र केवळ वैयक्तिक स्वरूपाची टीका झाल्याने याची खंत वाटते.  मी नसताना माझ्या मुदत वाढीची चर्चा झाली. मी त्यावेळी असतो तर लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करून बदलीची मागणी केली असती.  गेल्या तीन वर्षांमध्ये जेवढा विकास करायचा आहे तेवढा केला आहे. त्यामुळे शासनाला विनंती केली आहे की माझी बदली करावी. शासन जे निर्णय घेईल तो घेईल मात्र, ठाणेकरांमध्ये माझे जे रिपोर्टकार्ड तयार झाले आहे. मी गेल्यावर सर्वांना याची प्रचिती येईल, असे  उद्गार आयुक्तांनी काढले. 

गेले काही दिवस त्यांच्याविरोधात व्हायरल होत असलेल्या क्लिपची चौकशी करण्यासाठी आपण स्वत: पोलिसांना पत्र दिले असून त्यांचा या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आपली नाहक बदनामी करण्यासाठीच हा सर्व प्रकार केला असल्याचे यापूर्वीच आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र शुक्रवारी सभागृहात केलेल्या भावनिक भाषणामध्ये त्यांनी बदलीचे स्पष्ट संकेत दिले.