Fri, Apr 19, 2019 08:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मकरसंक्रांत अशुभ नाही : दा. कृ. सोमण

मकरसंक्रांत अशुभ नाही !

Published On: Jan 12 2018 10:07AM | Last Updated: Jan 12 2018 10:07AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

येत्या रविवारी अर्थात 14 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ त्याच दिवशी दुपारी 1.46 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. मकरसंक्रांतीचा आणि 14 जानेवारीचा तसा काहीही संबंध नाही. मकरसंक्रांत अशुभ नसते, असे प्रसिध्द खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण  यांनी स्पष्ट केले.

पुढील वर्षी संक्रांत 15 जानेवारीला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 2085 पर्यंत मकरसंक्रांती कधी 14 जानेवारीला तर कधी 15 जानेवारीला येणार आहे. सन 2100 पासून निरयन मकरसंक्रांती 16 जानेवारीला येणार आहे. अशारीतीने दिवस पुढे जात सन 3246 मध्ये निरयन मकरसंक्रांती 1 फेब्रुवारीला येणार आहे. सूर्याने 21 डिसेंबर रोजी जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश केला त्या दिवसापासूनच आपल्याकडे दिनमान वाढू लागले.

मकरसंक्रांती अशुभ असते असे जे म्हटले जाते ते चुकीचे आहे. दिनमान वाढत जाणे हे अशुभ कसे असू शकेल ? असा सवाल सोमण यांनी केला. वर्षभरात ज्यांच्याशी मतभेद किंवा भांडण झाले असेल त्यांना या दिवशी तीळगूळ देऊन गोड बोलण्यासंबंधी सांगितले जाते. मकरसंक्रांती पुण्यकाळात गरिबांना, गरजू लोकांना दान देण्यास  सांगण्यात आले आहे. मकरसंक्रांतीला काळे वस्त्र नेसण्याची पद्धत आहे. काळ्या रंगाची वस्त्रे या थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवतात, अन्यथा काळ्या कपड्यांचा आणि संक्रांतीचा तसा संबंध नसल्याचे ते म्हणाले.